जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम संपल्यानंतर सर्व क्रिकेटप्रेमींना या स्पर्धेच्या पुढील हंगामाचे वेध लागले आहेत. आयपीएलच्या पुढील हंगामात आणखी दोन संघांचा समावेश केला जाणार असून, याबाबतची प्रक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरू केली आहे. दोन नव्या संघांसाठी निविदा मागवल्या असून, परदेशातूनही यासाठी चांगलाच प्रतिसाद मिळतोय. त्याचाच एक भाग म्हणून जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी देखील आयपीएलची नवी फ्रॅंचाईजी विकत घेण्यात स्वारस्य दाखवले आहे.
मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी भरली निविदा
एका आघाडीच्या भारतीय वृत्तपत्राच्या बातमीनुसार,
‘इंग्लिश प्रीमियर लीगमधील फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचे संघमालक असलेल्या ग्लेसर कुटुंबाने नवी आयपीएल फ्रॅंचाईजी घेण्यासाठीची कागदपत्रे खरेदी केली असून, ते या सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. आता ते निविदा भरणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.’
बीसीसीआय २५ ऑक्टोबर रोजी नव्या संघांची घोषणा करेल. दोन नव्या संघांची मालकी घेण्यासाठी भारतातील तसेच विदेशातील अनेक उद्योगपती व संस्थांनी रस दाखवला आहे. अदानी ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा, संजीव गोयंका, रॉनी स्क्रूवाला तसेच इतर अनेकांनी यासाठीची कागदपत्रे खरेदी केली आहेत. सध्या दोन नवे संघ म्हणून अहमदाबाद व लखनौ यांची वर्णी लागू शकते असे म्हटले जात आहे. मात्र इंदोर, धर्मशाला, रांची व कोची ही शहरे देखील या शर्यतीत आहेत.
भारतीय क्रिकेटपटू फुटबॉलचे चाहते
जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो भाग असलेल्या मँचेस्टर युनायटेड संघाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. हा प्रीमियर लीग मधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. अनेक भारतीय खेळाडू देखील या संघाचे निस्सीम चाहते आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी नुकतीच या क्लबच्या मैदानाला भेट दिलेली. त्यावेळी क्लबकडून खास त्याच्यासाठी संघाची जर्सी भेट देण्यात आली होती.