भारतीय अ संघ सध्या विंडीज दौऱ्यावर असून त्यांचा विंडीज अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी(16 जूलै) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 148 धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारतीय अ संघाने 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताकडून मनिष पांडेने शतकी खेळी केली. तसेच शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये कृणाल पंड्याने 5 विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 6 बाद 295 धावा केल्या. भारताने या सामन्यात अनमोलप्रीत सिंगची विकेट लवकर गमावली होती. पण त्यानंतर शुबमन गिलने श्रेयस अय्यर बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी रचत संघाचा डाव सांभाळला.
शुबमन 81 चेंडूत 77 धावांची खेळी करुन बाद झाला. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच श्रेयसनेही या सामन्यात 47 धावांची छोटेखानी खेळी केली. शुबमन आणि श्रेयसला रकिम कॉर्नवॉलने बाद केले.
पण त्यानंतर कर्णधार मनिषने आक्रमक खेळताना 87 चेंडूत 100 धावांची खेळी करत भारताला 290 ची धावासंख्या पार करुन दिली. या खेळीत मनिषने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच भारताकडून हनुमा विहारीने 29 धावांची तर इशान किशनने 24 धावांची खेळी केली.
विंडीजकडून रोमारिओ शेफर्ड आणि रकिम कॉर्नवॉलने सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच किमो पॉल आणि रेमंड रेफरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 296 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 34.2 षटकात सर्वबाद 147 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून सुनील अँब्रिस आणि जॉन कॅम्पबेलने 51 धावांची सलामी भागीदारी रचत चांगली सुरुवात केली होती. मात्र कॅम्पबेलला(21) नवदीप सैनी आणि अँब्रिसला(30) आवेश खानने बाद केले.
त्यानंतर मात्र विंडीजच्या फलंदाजांना कृणालची गोलंदाजी खेळताना संघर्ष करावा लागला. त्यांचे 5 फलंदाज कृणालच्या गोलंदाजीवर बाद झाले. तसेच विंडीजच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. पण अखेरीस किमो पॉलने 16 चेंडूत 34 धावांचा तडाखा दिला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
भारताकडून कृणाल पंड्याने 7 षटकात 25 धावा देत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तसेच विहारीने 2 विकेट्स तर नवदीप सैनी, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या या क्रिकेटपटूच्या भावाची झाली हत्या, तरीही तो खेळत होता संघासाठी
–विश्वचषक जिंकला इंग्लंडने, सोशल मीडियावर चर्चा झाली टीम इंडियाची
–मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने विजेता ठरवण्यासाठी बाउंड्री नियमाऐवजी सुचवला हा पर्याय