कोची, दिनांक 23 ऑक्टोबर : हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरला ब्लास्टर्स एफसीची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. सलामीच्या लढतीमधील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला ब्लास्टर्स घरच्या मैदानावर मुंबईविरुद्ध निर्धाराने खेळेल.
ब्लास्टर्सला स्थानिक चाहत्यांचा वादळी पाठिंबा मिळतो. एटीकेविरुद्ध ब्लास्टर्सने कामगिरीचे चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांना घरच्या मैदानाचा अधिकाधिक फायदा उठविण्याची आशा आहे. साधारणपणे घरच्या मैदानावर चांगला खेळ झाला तर ब्लास्टर्सची एकूण कामगिरी उत्तम होते. 2014 आणि 2016 अशा दोन मोसमांत ब्लास्टर्सने बाद फेरी गाठली होती. दोन्ही वेळा घरच्या मैदानावर ते एकदाच हरले होते.
नेदरलँड््सचे शात्तोरी म्हणाले की, तुम्ही घरच्या मैदानावर खेळता तेव्हा थोडा फायदा होतो.
मुंबईच्या संघाविषयी काही बाबी आश्चर्यकारक आहेत. याचे कारण हा संघ अद्याप खेळलेला नाही. ब्लास्टर्सचा एक सामना झाला असल्यामुळे मुंबईचे प्रशिक्षक जोर्गे कोस्टा यांना प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा अंदाज घेण्याची संधी आहे. ही मुंबईसाठी जमेची बाजू असल्याचे शात्तोरी यांना वाटते, पण म्हणून ते चिंतेत नाहीत.
शात्तोरी म्हणाले की, मुंबईची खेळण्याची शैली माझ्यासाठी स्पष्ट आहे. तुम्ही सामने पाहिले नसतील तर प्रतिस्पर्धी मैदानावरील जागा कशा आणि कोणत्या खेळाडूंसह भरून काढतात याविषयी नेहमीच प्रश्नचिन्ह असते. तुम्ही प्रतिस्पर्ध्याला पूर्वी एकदा खेळताना पाहिले असेल तर त्यामुळे फरक पडतो, पण आमच्यासमोर हे आणखी एक आव्हान असेल.
मुंबईचे प्रशिक्षक कोस्टा यांनी मात्र सांगितले की, या सामन्यात ब्लास्टर्सकडून काय अपेक्षा ठेवायची हे मला कळले आहे. आम्ही त्यांच्या खेळाचा अभ्यास केला, पण तो मोसमातील पहिलाच सामना होता. तो सामना अगदी अप्रतिम ठरला नसला तरी फार चांगला होता. मी ब्लास्टर्सचा खेळ प्रथमच पाहिला, पण ते आश्चर्यकारक ठरले नाही. याचे कारण मला त्यांचे खेळाडू आणि प्रशिक्षक माहित आहेत.
मुंबईची मदार पाऊलो मॅचाडो आणि मोडोऊ सौगौ अशा खेळाडूंवर असेल. गतमोसमात बाद फेरीतील संघाच्या प्रवेशात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. रॉलीन बोर्जेस, रेनीयर फर्नांडीस यांच्यासह काही महत्त्वाचे भारतीय खेळाडू त्यांच्या मध्य फळीत आहेत. मैदानाच्या मध्यापासून ते संघाच्या मोहिमेला गती देण्याची अपेक्षा आहे.
सर्जी केव्हिन आणि अॅमीने चेर्मिटी अशा नव्या खेळाडूंच्या भेदक खेळावमुळे आक्रमण वेगवान होईल अशी त्यांची आशा असेल. त्यामुळे ब्लास्टर्सच्या जियान्नी झुईवर्लून आणि जैरो रॉड्रीग्ज यांना सतत सजग राहावे लागेल.
ब्लास्टर्ससमोर प्रभावी मध्यरक्षक मारीओ आर्क्वेस यांच्या तंदुरुस्तीचे प्रश्नचिन्ह असेल. पहिल्या सामन्यात जायबंदी झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. तो या सामन्यास मुकेल, पण स्टार स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर सारी मदार असेल. पहिल्या सामन्यात त्याने दोन गोल करीत अपेक्षित कामगिरी पार पाडली.
केरळ दोन सामन्यांत दोन विजय मिळवून आघाडी घेणार का की मुंबई विजयाने मोसमाची सुरूवात करणार याची उत्सुकता असेल.