मुंबई। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटीची शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीच्या शर्यतीमधील पिछाडी भरून काढण्याचे आव्हान मुंबई सिटीसमोर असेल.
मुंबईचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. जिंकल्यास ते ओदीशाला मागे टाकून दोन गुणांनी पुढे जाऊ शकतात.
मागील लढतीत जोर्गे कोस्टा यांच्या मुंबईला हैदराबाद एफसीविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधावी लागली.
या लढतीत मोडोऊ सौगौ पहिल्यापासून खेळण्याइतपत तंदुरुस्त असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईचे आक्रमण भक्कम होईल. प्रतिक चौधरीची उणीव मात्र त्यांना जाणवेल. चार यलो कार्डसमुळे तो निलंबीत आहे. 19 वर्षांच्या हमिंगथान माविया मॅटो ग्रजिच याच्या साथीत बचाव फळीत खेळण्याची अपेक्षा आहे. मुंबई यंदा घरच्या मैदानावर तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.
रॉलीन बोर्जेस याने सौरव दास याच्या साथीत प्रभावी फॉर्म राखला आहे. त्यांच्यातील समन्वय गेल्या दोन सामन्यांत आणखी उंचावला आहे.
हैदराबादविरुद्ध मुंबईला गोलच्या संधी निर्माण करताना झगडावे लागले. त्यामुळे कोस्टा आघाडी फळीला साथ मिळण्यासाठी डावपेच बदलण्याची अपेक्षा आहे.
कोस्टा यांनी सांगितले की, माझे खेळाडू सर्वोत्तम प्रयत्न करतील याची खात्री आहे. मी संघातील एक-दोन खेळाडू बदलू शकतो, पण पूर्ण पद्धत नाही. काय घडेल किंवा मोसमाचा शेवट कसा होईल हे मला माहित नाही, पण आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि कसून सराव करीत आहोत हे मला माहित आहे. या टप्यास गमावलेले गुण भरून काढणे अवघड असते, पण आम्ही जिंकण्यासाठी सर्वोच्च क्षमता पणास लावू.
नॉर्थईस्टसमोर अनेक प्रश्न आहेत. मोसमात सर्वांत कमी नऊ गोल त्यांचे आहेत. त्यातच बाहेरील मैदानांवरील सामन्यांत (अवे मॅचेस) त्यांना तीनच गोल करता आले आहेत. मागील तीन अवे लढतींत त्यांना एकही गोल करता आलेला नाही. त्यांच्या मध्य फळीत कल्पकतेचा अभाव राहिला आहे. बहुतांश सामन्यांत ते प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस ठरू शकलेले नाहीत.
त्यातच दुखापतीमुळे त्यांच्या मोहिमेवर परिणाम झाला आहे. स्टार स्ट्रायकर असामोह ग्यान याला मोसमातील बहुतांश काळ दुखापतीमुळे बाहेर राहावे लागले. नंतर तो उर्वरीत मोसमास मुकणार असल्याचे स्पष्ट झाले. फेडेरीको गॅलेगो याला गतवर्षी बाद फेरीत दुखापत झाली. त्यातून सावरल्यापासून त्याला अद्याप सर्वोत्तम फॉर्म गवसलेला नाही.
नवे खेळाडू अँडी किऑघ आणि सायमन लुंडेवाल यांना अद्याप हवामानाशी जुळवून घेता आले नसून ते संघाशी एकरूप व्हायचे आहेत. रॉबर्ट जार्नी यांचा संघ गुणतक्त्यात नववा आहे. त्यांना अंधूक आशा कायम राखण्यासाठी यापुढे गुण गमावून चालणार नाही.
बचाव फळीत मात्र मिस्लाव कोमोर्स्की आणि गोलरक्षक शुभाशिष रॉय चौधरी यांनी प्रभाव पाडला आहे. अनेक गोल रोखण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
नॉर्थईस्ट आठ सामन्यांत विजयापासून दूर आहे. त्यांना कामगिरी उंचावण्यासाठी प्रेरणेची नितांत गरज आहे.