आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अनुपस्थिती सर्वाधिक जाणवू शकते. हा अनुभवी वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे गेल्या वर्षभरापासून भारतीय संघाबाहेर आहे. शमीनं नुकतंच रणजी ट्रॉफीद्वारे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं. मात्र त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात जागा मिळाली नाही. आता ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडननं सांगितलं की, भारतीय संघाला शमीचा पर्यायी खेळाडू मिळाला आहे.
टीम इंडियाला आता मोहम्मद शमीची गरज आहे का? असा सवाल मॅथ्थू हेडननं उपस्थित केला आहे. सध्या या प्रश्नाचं कोणतंही ठोस उत्तर नाही, कारण जगातील कोणत्याही संघाला मोहम्मद शमीसारखा गोलंदाज आपल्यासोबत ठेवायला आवडेल. चला तर मग जाणून घेऊया शमीच्या जागी हेडननं कोणाचं नाव घेतलं.
मॅथ्यू हेडन प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीपबद्दल बोलला आहे. त्यानं आकाश दीपवर अधिक भर दिला. हेडन म्हणाला की, प्रसिद्ध कृष्ण चांगला आहे, पण शमीच्या जागी आकाश दीप हा योग्य पर्याय असेल. चॅनल 7 शी बोलताना हेडन म्हणाला, “प्रसिद्ध कृष्णानं अनधिकृत कसोटीत चांगली कामगिरी केली. मात्र माझ्या मते आकाश दीप हा शमीच्या जागी चांगला रिप्लेसमेंट आहे. आकाश पर्थ आणि ॲडलेडमध्ये चांगली कामगिरी करेल.”
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, आकाश दीप पहिल्या दिवसापासून शमीचा रिप्लेसमेंट मानला जात आहे. त्याची गोलंदाजीही काहीशी शमीसारखीच आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची उत्तम क्षमता आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद शमी आणि आकाश दीप हे दोघंही बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतात.
27 वर्षीय आकाशदीपनं या वर्षी कसोटीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून, 8 डावात गोलंदाजी करत 25.80 च्या सरासरीनं 10 बळी घेतले आहेत. आता ऑस्ट्रेलियात तो कशी कामगिरी करतो हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
हेही वाचा –
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली! कर्णधारानं दिलं मोठं अपडेट
बुमराह-कमिन्स दोघे मिळून अनोखा विक्रम रचणार, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असे फक्त 5 वेळा घडले
‘माझे मन म्हणतं भारत जिंकेल, पण…’, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी