क्रिकेटमध्ये मैदानावर विविध घटना घडत असतात. यातील काही दुर्दैवी घटनाही असतात. अशी एक घटना ६० वर्षांपूर्वी घडली होती. ही घटना भारताचे माजी क्रिकेटपटू नारी काॅन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर घडली होती. ते ६० वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना फलंदाजी दरम्यान वेस्ट इंडिजचा गोलंदाज चार्ली ग्रिफिथ याचा बाउंसर चेंडू त्यांच्या डोक्यात लागला होता.
त्यावेळी त्यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर यांच्या (Nari Contractor) डोक्यात मेटल प्लेट बसवण्यात आली होती. ती प्लेट नूकतीच डाॅक्टरांनी काढली आहे.
भारतीय संघ (Team India) १९६२ साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता, यावेळी बार्बाडोस येथे झालेल्या एका सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज चार्ली याच्या चेंडूचा सामना करताना तो चेंडू त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागात लागला होता, या दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच या दुखापतीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द तेथेच संपली. त्याच काळात त्यांची टाइटेनियम प्लेट लावण्याशिवाय अनेक ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी ते कोमातही गेले होते.
कॉन्ट्रॅक्टर यांचा मुलगा होशेदार काॅन्ट्रॅक्टरने माध्यमांशी बोलताना सांगितले की ८८ वर्षीय माजी कर्णधार नारी कॉन्ट्रॅक्टर यांची बुधवारी मुंबईच्या दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ते बरे होत आहेत. ते म्हणाले, “एक कुटूंब म्हणून आम्हाला या गोष्टीची काळजी होती की, या वयात ते पोस्ट ऑफनंतर स्वत:ला संभाळू शकतील का? परंतु, ते ठीक आहेत आणि सक्रीय सुद्धा आहेत. डाॅक्टर हर्षद पारेख आणि डाॅक्टर अनिल टिबरेवालाने खूप चांगली कामगिरी केली आहे.”
या दुखापतीशिवाय त्यांनी १९५९ मध्ये लाॅर्डलमध्ये इंग्लंडविरुद्ध ८१ धावांची खेळी खेळली होती, ज्यावेळी ब्रायन स्टॅथमच्या चेंडूवर त्यांच्या दोन बरकड्या तुटल्या होत्या. तसेच जेव्हा ते बार्बाडोसमध्ये दुखापतग्रस्त झाले होते, तेव्हा वेस्ट इंडिजचा कर्णधार फ्रॅंक वाॅरेल आणि संघातील अनेक खेळाडूंसह भारतीय खेळाडूंनी देखील रक्तदान केले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा