मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम सुरु असून या लीगचा पाचवा सामना बुधवारी खेळविण्यात आला. लीगच्या पाचव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर आला. अबूधाबीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई संघाने 195 धावा केल्या आणि नंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाला 146 धावांवर गुंडाळत 49 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईच्या संघाने युएईच्या मैदानावर प्रथमच सामना जिंकला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने 80 धावांची मॅच विनिंग खेळी केली. तसेच याविजयासह मुंबईच्या संघानेही अनेक विक्रम नोंदविले. त्या विक्रमांवर एक नजर टाकूया-
एकाच संघाविरूद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम
आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही एका संघाविरूद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम मुंबई संघाने केला आहे. मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध आपला 20 वा विजय मिळवला. आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध 20 विजय मिळवणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ आहे.
त्याचबरोबर एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या या यादीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघही आहे. त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाविरुद्ध 17 विजय मिळवले. मुंबई इंडियन्स संघानेही चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही 17 विजय मिळवले आहेत. तसेच आरसीबीविरुद्ध मुंबईच्या संघाने 16 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी विरुद्ध प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत.
युएईमध्ये मुंबईने आपला पहिला सामना जिंकला
युएईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने पहिला विजय मिळविला. मुंबई इंडियन्स संघाने युएईच्या मैदानावर आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना एकमेव विजय मिळाला. 2014 साली जेव्हा मुंबईचा संघ युएईला पोहोचला तेव्हा त्यांनी येथे खेळलेल्या पाचही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेसच आयपीएल 2020 मध्ये पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईचा पराभव केला.
रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर जिंकणारा भारतीय ठरला
रोहित शर्माच्या शानदार खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. आयपीएलमध्ये १८ व्यांदा रोहितने सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा भारतीय ठरला आहे. त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने १७ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या एकूण यादीत अव्वल क्रमांकावर २१ सामनावीर पुरस्कारांसह ख्रिस गेल अव्वल क्रमांकावर आहे. तर २० सामनावीर पुरस्कारांसह एबी डिविलियर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रोहित या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या पाठोपाठ धोनी आणि डेव्हिड वॉर्नर १७ सामनावीर पुरस्कारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर युसुफ पठाणने १६ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.