ऍडलेड येथे शनिवारी (१९ डिसेंबर) पार पडलेला भारत व ऑस्ट्रेलिया मधील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने जिंकला. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीने भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या डावात एकही फलंदाज १० धावा करेपर्यंत मैदानावर टिकू शकला नाही. त्यातही युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दोन्ही डावातही सपशेल फ्लॉप ठरला. त्यामुळे शॉला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर करण्याची मागणी होत आहे. परंतु माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकल बेवन यांनी शॉचा बचाव केला आहे.
शुबमन गिलऐवजी दिली पृथ्वी शॉला संधी
कसोटी मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये २ सराव सामने खेळण्यात आले होते. या दोन्ही सराव सामन्यात मिळून शॉने ६२ धावा केल्या होत्या, तर गिलने शॉपेक्षा दुप्पट १३७ धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचाही समावेश होता. तरीही भारतीय कर्णधार विराट कोहलीने शॉवर जास्त विश्वास दाखवत त्याला पहिल्या कसोटी सामन्यात संधी दिली होती.
पृथ्वी शॉला अजून एक संधी द्यावी- बेवन
क्रिकेट बेस्ट डॉट कॉमशी याविषयी बोलताना मायकल बेवन म्हणाले की, “मला शुबमन गिलला फलंदाजी करताना पाहायला खूप आवडते. तो खरोखरच खूप उत्कृष्ट फलंदाज आहे. पण पृथ्वी शॉदेखील मला उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत मोडतो असे मला वाटते.”
“क्रिकेटजगतात कित्येक खेळाडूंना पुन्हा-पुन्हा संधी दिली जाते. एका सामन्यात खेळाडूची निवड करणे आणि पुढे त्याला संघात कायम न ठेवणे खूप अवघड असते. म्हणून मला वाटते की, पूर्ण मालिकेसाठी एखाद्या खेळाडूची निवड केल्यास तो २ किंवा ३ सामन्यांचा हक्कदार असतो. त्यामुळे शॉलाही पुढील सामन्यात संधी मिळावी. जर तो दुसऱ्याही सामन्यात धावा करू शकला नाही, तर शुबमनला आजमावण्यात यावे,” असे बेवन पुढे म्हणाले.
निक नाइट यांनी शॉला बाहेर करण्याचा दिला होता सल्ला
भारत-ऑस्ट्रेलिया दिवस- रात्र कसोटी सामन्याचे समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू निक नाइट यांनी यापूर्वी शॉला दुसऱ्या कसोटी सामन्यातून संघाबाहेर करण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, “ही खरोखरच विचार करण्याजोगी गोष्ट आहे. शॉचा बॅकलिफ्ट दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लिपमधून येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या वेगवान गोलंदाजांना ही शैली ज्ञात आहे. त्यामुळे शॉला बाद करणे त्यांच्यासाठी खूप साधे काम आहे. कसोटी सामन्याच्या आधीपासून मी पाहत आहे. शॉने त्याच्या फलंदाजी शैलीत तीळभरही सुधारणा केलेली नाही.”
“जेव्हा कोणता खेळाडू स्वत:ला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करुन दाखवतो, तेव्हा काही काळाच्या खराब फॉर्मनंतरही त्याला संधी दिली पाहिजे. पण सध्या शॉची फलंदाजी शैली पाहून मला वाटते की, त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी”, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक
“टीम इंडियाला रोहित शर्माची नितांत गरज, लवकरात लवकर संघात सहभागी करावे”
शास्त्रींची हाकालपट्टी करून ‘या’ दिग्गजाकडे सोपवावे प्रशिक्षकपद; कसोटीतील पराभवानंतर जोरदार मागणी