मुंबई, दि. ११ (क्री.प्र.)- प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेला शेवटच्या क्षणी मुंबई पोस्टलकडून अवघ्या २ गुणांनी हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना बाद फेरीतच पराभवाचा धक्का बसला. आता मुंबई पोस्टलचा संघ उपांत्य फेरीत मिडलाईन अॅकॅडमीशी भिडेल तर दुसरा उपांत्य सामना ठाणे महानगरपालिका आणि रुपाली ज्वेलर्स यांच्यात होईल.
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कबड्डीप्रेमींना आगळावेगळा थरार पाहायला मिळाला. साखळीत दोन्ही सामने जिंकणारे मुंबई महानगर पालिका, आयएसपीएल आणि मुंबई बंदर हे तिन्ही संघ बाद फेरीत बाद झाले आणि केवळ एक सामना जिंकून बाद फेरीत गाठणार्या चारही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोस्टल यांच्यातील सामना कमालीचा चुरशीचा झाला. मनमीत कुमार आणि विशाल कुमार यांच्या जोरदार खेळाच्या जोरावर मुंबई पालिकेने मध्यंतराला २१-१९ अशी छोटीशा का होईना आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात अभि भोजने आणि मयुर शेख यांनी मुंबई पालिकेची आघाडी मोडीत काढली आणि शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या संघर्षात ४०-३८ अशी बाजी मारली. रुपाली ज्वेलर्सच्या सतपाल कुमावत आणि खेमचंद भोई यांनी सुसाट खेळ करत सुरुवातीपासूनच संघाला आघाडीवर ठेवले. त्रिमूर्ती एंटरप्राइजेसला आपली पिछाडी कमी करता आली नाही. परिणामता अत्यंत नीरस आणि कंटाळवाण्या झालेल्या सामन्यात रुपाली ज्वेलर्सने ४३-२३ असा सहज विजय नोंदविला.