जगातील सर्वात मोठी क्रीडास्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकला शुक्रवारी (२३ जुलै) सुरुवात झाली. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशीच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली. भारतीय वेटलिफ्टर मिराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक कमावत भारताच्या पदकांचे खाते खोलले. या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असताना तिच्या गृहराज्य असलेल्या मणिपूरच्या सरकारने तिला पोलीस खात्यात उच्च पदावर नोकरीस घेत असल्याचे जाहीर केले आहे.
मिराबाईने खोलले होते पदकांचे खाते
शनिवारी झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत मिराबाई चानूने स्नॅच प्रकारात ८७ व क्लिन अँड जर्क प्रकारात ११५ असे एकूण २०२ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. चीनच्या झिहुई हो हिने सुवर्णपदक तर, इंडोनेशियाच्या विंडी केंटीकाने कांस्य पदक आपल्या नावे केले. २००२ सिडनी ऑलिंपिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरी हिने कांस्य पदक मिळविल्यानंतर वेटलिफ्टिंग मधील हे भारताचे केवळ दुसरे पदक आहे.
मणिपूर पोलीस खात्यात दिली गेली नोकरी
सध्या भारतीय रेल्वेत कार्यरत असणाऱ्या मिराबाई चानूला मणिपूर सरकारने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे पद देऊ केले आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये जुडो खेळात सहभागी झालेली सुशीलादेवी हिलादेखील पोलीस कॉन्स्टेबलवरून पोलीस उपनिरीक्षक अशी पदोन्नती देण्यात आली.
ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पाच मणिपूरी खेळाडूंना प्रत्येकी २५ लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच मणिपूरमध्ये जागतिक दर्जाची वेटलिफ्टींग अकादमी उभारण्यात येईल. या सर्व घोषणा मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभचा इंग्लंडमधील नवा मित्र पाहिला का? स्वतः शेअर केला व्हिडिओ
आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या फॅन्सने केले सीएसके चाहत्यांना ट्रोल, पाहा मजेदार मीम
‘तर, मी असो किंवा अन्य कोणी, तुम्हाला संघाबाहेर बसावेच लागेल’, चहलचे मोठे भाष्य