भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत २ गडी राखून मिळवला. परंतु भारतीय संघाला ही मालिका २-१ ने गमवावी लागली. दरम्यान तिसऱ्या सामन्यात अवघ्या १६ धावा करणाऱ्या मिताली राजने मोठा पराक्रम करत दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार मिताली राजने २८ चेंडूंचा सामना करत १ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १६ धावा केल्या होत्या. यशस्वीरित्या धावांचा पाठलाग करताना मिताली राजची सरासरी १०६ आहे. यादरम्यान तिने ६८ सामन्यांच्या ५४ डावात २१२७ धावा केल्या आहेत, तर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने १०२.७१ च्या सरासरीने ११६ सामन्यांच्या ७५ डावात २८७५ धावा केल्या होत्या. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. कोहलीने ९६ च्या सरासरीने ८९ सामन्यांच्या ८६ डावात ५३८८ धावा केल्या आहेत. त्यामुळे मिताली राज ही धावांचा पाठलाग करताना एमएस धोनी आणि विराट कोहलीपेक्षाही पुढे आहे.
मिताली राज ही भारतीय महिला संघाची कर्णधार आहे. तिच्या वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत एकूण २२० सामने खेळले आहेत. दरम्यान १९९ डावात तिने ५१.३२ च्या सरासरीने ७३९१ धावा केल्या आहेत. यामध्ये ५९ अर्धशतके आणि ७ शतकांचा समावेश आहे.
तसेच तिसऱ्या वनडे सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाकडून ॲश्ले गार्डनरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली होती, तर बेथ मूनीने ५२ धावांचे योगदान दिले होते. ५० षटकाअखेर ऑस्ट्रेलिया संघाला ९ बाद २६४ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाकडून यास्तिका भाटियाने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली होती, तर शेफाली वर्माने ५६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाची सलग २६ सामने जिंकण्याची साखळी मोडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ खेळाडूची लागली ‘लॉटरी’, टी-२० विश्वचषकात घेणार हार्दिक पंड्याची जागा?
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच