सेंट लूसिया| वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. यजमान वेस्ट इंडिजने या मालिकेतील सुरुवातीचे तिन्ही टी२० सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. परंतु पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ क्लिन स्वीपच्या नामुष्कीपासून वाचण्यासाठी सर्वकाही पणाला लावताना दिसत आहे. बुधवारी (१४ जुलै) उभय संघात चौथा टी२० सामना झाला. या सामन्यातील शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने २० षटकाखेर ६ बाद १८९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर लिंडल सिमन्स याने ४८ चेंडूत २ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली होती. त्याच्या या ताबडतोब खेळीमुळे वेस्ट इंडिजने १८ व्या षटकापर्यंत ५ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिज संघाला शेवटच्या २ षटकात विजयासाठी ३६ धावांची आवश्यकता होती. आंद्रे रसेल (नाबाद ११ धावा) आणि फॅबियन ऍलेन (११ धावा) मैदानावर होते. १९ व्या षटकातील रिले मेरेडिथच्या पहिल्याच चेंडूवर रसेलने खणखणीत षटकार ठोकला. त्यानंतर १ धाव घेत ऍलेनकडे स्ट्राईक दिली. पुढील ३ चेंडूवर सलग ३ षटकार मारत ऍलेनने संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. मात्र शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू वेडच्या हाती झेल देत तो पव्हेलियनला परतला.
आता अष्टपैलू रसेलच्या खांद्यावर संघाच्या विजयाची जबाबदारी होती. शेवटचे षटक अर्थातच केवळ ६ चेंडू बाकी होते आणि विजयासाठी ११ धावांची गरज होती. रसेलपुढे ऑस्ट्रेलिया अव्वल वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे आव्हान होते. स्टार्कच्या पहिल्या ४ चेंडूंवर रसेलला मोठा फटका मारता आला नाही आणि त्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात एकही धाव घेतली नाही. त्यामुळे पहिले ४ चेंडू निर्धाव राहिल्याने स्टार्कने जवळजवळ ऑस्ट्रेलियाचा विजय सुनिश्चित केला.
तरीही शेवटच्या २ चेंडूंवर वेस्ट इंडिजच्या अपेक्षा पल्लवित होत्या. पाचव्या चेंडूवर २ धावा घेत रसेलने पुन्हा स्ट्राईक आपल्याकडेच ठेवली. अखेरच्या चेंडूवर जबरदस्त चौकारही खेचला. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि वेस्ट इंडिजने ४ धावांनी सामना गमावला.
https://twitter.com/MitchellStarc52/status/1415524591418503171?s=20
परंतु या ६ चेंडूंमधील स्टार्क विरुद्ध रसेल यांची लढाई क्रिकेटशौकिनांसाठी मात्र पर्वणी ठरली. या चुरशीच्या भिंडतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १९ हजारपेक्षा जास्त धावा चोपणाऱ्या दिग्गजावर मोठी जबाबदारी, ‘या’ संघाचा बनला हेड कोच