येत्या २३ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. तर भारतीय संघाची पहिलीच लढत पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. तर या मोठ्या सामन्यापूर्वी अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपले मत मांडताना दिसून येत आहेत. दरम्यान पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने शाहीन आफ्रिदी आणि जसप्रीत बुमराह यांची तुलना केली आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. तर शाहीन आफ्रिदी देखील पाकिस्तान संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. अशातच ‘अनकट’ नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवर जेव्हा मोहम्मद आमिरला जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला, “जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांची तुलना करणे माझ्या मते मूर्खपणा असेल.”
मोहम्मद आमिर पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराहने आपल्या संघासाठी अनेकदा मोलाची भूमिका बजावली आहे. तर शाहीन आफ्रिदी सध्या शिकतोय. जसप्रीत बुमराह हा शेवटच्या षटकांमध्ये जगातील सर्वात घातक गोलंदाज आहे. तर शाहीन आफ्रिदी युवा गोलंदाज आहे. तरीदेखील तो चांगली गोलंदाजी करतो.”
“भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तान संघाचे गोलंदाजी आक्रमण चांगले आहे. पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ आणि हसन अली हे तिन्ही गोलंदाज टी-२० क्रिकेटच्या अंतिम षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतात. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह एकमेव गोलंदाज आहे, जो चांगली गोलंदाजी करतोय. तर भुवनेश्वर कुमारला चांगली कामगिरी करण्यात अपयश येत आहे. तसेच मोहम्मद शमी देखील आयपीएल स्पर्धेत अडचणीत दिसून येत होता. तर आर अश्विन आणि वरूण चक्रवर्ती यांनी चांगली कामगिरी केली आहे,” असे मोहम्मद आमिर म्हणाला.
कदाचित मोहम्मद आमिर हे विसरला आहे की, मोहम्मद शमीने सराव सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. पाकिस्तान सामन्याने आयसीसीचा भरणार खिसा! एकाच मॅचमधून कमावणार १२० कोटी रुपये
टी२० विश्वचषकातील ‘गोलंदाजीचा किंग’ बनला शाकिब, नोंदवला विश्वविक्रम; भारतीय बॉलर आसपासही नाहीत






