भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (mohammad kaif) आणि स्टुअर्ट बिन्नी (stuart binny) या महिन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसतील. २० जानेवारीपासून लिजेंड्स क्रिकेट लीगची सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये हे दिग्गज इंडिया महाराज (india maharaj) संघात सहभागी होणार आहेत. या लीगमध्ये फक्त तेच खेळाडू सहभाग घेऊ शकणार आहेत, ज्यांनी यापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. लीगमध्ये तीन संघ सहभागी होणार आहेत, ज्यापैकी एक इंडिया महाराज आहे. इंडिया महाराजने शुक्रवारी (७ जानेवारी) हे दोन दिग्गज संघात सामील झाल्याची माहिती दिली.
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या लीगचे आयुक्त आहेत. शास्त्रींनी कैफ आणि बिन्नीच्या स्पर्धेतील सहभागाची माहिती देताना सांगितले की, “मोहम्मद कैफ आणि स्टुअर्ट बिन्नीचे भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान आहे आणि मला वाटते की, लीगमध्येही त्यांची मोठी भूमिका असेल.” भारताच्या संघाव्यतिरिक्त लीगमध्ये आशिया लायन्स आणि जगातील इतर देशांच्या क्रिकेटपटूंचा एक संघ असणार आहे.
असा असेल इंडिया महाराजचा संघ
काही दिवसांपूर्वी भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग आणि नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला हरभजन सिंग देखील या लीगमध्ये सहभागी झाला आहे. त्याव्यतिरिक्त इरफान पठाण आणि यूसुफ पठाण देखील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच एस बद्रीनाथ, हेमांग बदानी, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, वेणुगोपाल राव, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी देखील स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. हे सर्व खेळाडू इंडिया महाराज संघाकडून खेळतील.
असा असेल आशिया लायन्स संघ
स्पर्धेतील दुसरा संघ आहे आशिया लायन्स, ज्यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचे खेळाडू सहभाग घेणार आहेत. या संघात पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सहभागी होणार आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याही या संघात असेल. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानचा शाहिद अफ्रिदी, कामरान अकमल, अजहर महमूद, मिस्बाह उल हक, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, मोहम्मद यूसुफ आणि उमर गुल संघात सामील असतील. श्रीलंकेकडून या संघात मुथैया मुरलीधरन, चमिंडा वास, रोमेश कालूवितरणा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा सामील असतील. अफगाणिस्ताचा माजी कर्णधार असगर स्टानिकजाई देखील आशिया संघात असतील.
लीगमध्ये सहभागी होणाऱ्या तिसऱ्या संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. तिसऱ्या संघात ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज या संघातील खेळाडू असतील, अशी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका क्रिकेटमधील निवृत्ती सत्र सुरूच! आजच बॅन हटविलेला ३० वर्षीय फलंदाज निवृत्त
“… तेव्हा शार्दुल खूप रागावलेला”; सहकाऱ्याने सांगितली ‘ती’ आठवण
स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर १२ वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत अजिंक्य क्रिकेट क्लबचा रोमहर्षक विजय
व्हिडिओ पाहा –