बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेट्सने पराभूत केले. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर आघाडीवर असणाऱ्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशी पुरती दैना झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघ २ तासही टिकू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाने केवळ ३६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी मिळून सामना आपल्या खिशात घातला. अशात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला धुव्वाधार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने जबरदस्त तोडगा सुचवला आहे.
मेलबर्नमध्ये होणार दुसरा कसोटी सामना
येत्या २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. हा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.
केएल राहुल सर्वोत्कृष्ट पर्याय
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना कैफ म्हणाला की, “मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळताना खेळाडूंना बऱ्याच अडचणी येतात. अशात भारतीय संघाला त्यांच्या अंतिम पथकात बदल करण्याची गरज भासली, तर त्यांच्याकडे केएल राहुल आणि शुबमन गिल यांचे पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर भारतात परतणार आहे. त्यामुळे मला वाटते की, कोणत्याही परिस्थितीत राहुलला अंतिम ११ जणांच्या पथकात सहभागी करण्यात यावे.”
“राहुलला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा बराच अनुभव आहे. भारतीय कसोटी संघातून बाहेर केल्यापासून राहुलने त्याच्या खेळीवर काम केले आहे. त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्याचेही दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेत त्याचे प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे. त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले पाहिजे,” असे पुढे बोलताना कैफने सांगितले.
शुबमन गिलला आजमवण्यात यावे- कैफ
एवढेच नव्हे, तर माजी भारतीय फलंदाज कैफने शुबमन गिललाही संधी देण्याचे वक्तव्य केले. तो म्हणाला, “शुबमन गिलच्या फलंदाजीची सध्या खूप चर्चा झाली आहे. त्याने आयपीएल २०२०मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. म्हणून मला वाटते की, एकदा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात त्याला आजमावण्यात यावे.”
केएल राहुलची कसोटी आकडेवारी
केएल राहुलने डिसेंबर २०१४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून राहुलने फक्त ३६ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५ शतकांच्या मदतीने २००६ धावा केल्या आहेत. यात ११ अर्धशतकांचाही समावेश आहे. ऑगस्ट २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणाऱ्या जोश हेजलवूडने उलगडला आपला ‘गेम प्लॅन’
फ्लॉप शोनंतरही ‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज देतोय पृथ्वी शॉला पाठिंबा, काय आहे यामागचं कारण
दुसऱ्या कसोटीत भारतासाठी ‘हा’ खेळाडू ठरू शकतो मोठा ‘गेमचेंजर’, ऑसीच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व
भारतीय संघाचे ६ धडाकेबाज खेळाडू, ज्यांनी २०२० मध्ये केले क्रिकेटला ‘बाय बाय’
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात ‘हे’ ५ बदल