पुणे। महा टेनिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज एपीएमटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून 100 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा 29 फेब्रुवारी ते 6 मार्च 2020 या कालावधीत डेक्कन जिमखाना-आदर पुनावाला टेनिस अकादमी येथील टेनिस कोर्टवर पार पडणार आहे.
स्पर्धेच्या संचालिका राधिका तुळुपुळे-कानिटकर यांनी सांगितले कि, स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, हरयाणा, पश्चिम बंगाल, केरळ, उत्तरप्रदेश या ठिकाणांहून 100 हुन अधिक खेळाडू झुंजणार आहेत.
स्पर्धेत महाराष्ट्रातून समर्थ संहिता, ऋषिकेश रामनाथन, शौर्या घोडके, सक्षम भन्साळी, तेज ओक, नीरज जोर्वेकर, सिया प्रसादे, आकृती सोनकुसरे, प्रिशा शिंदे, देवांशी प्रभुदेसाई, मृणाल शेळके हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
ही स्पर्धा 12वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.