पुणे । महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशन आणि सॅम्बो फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या वतीने १० व्या राष्ट्रीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाळुंगे बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात मंगळवार दिनांक १८ ते गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती सॅम्बो फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव दिप्तीराम शर्मा आणि महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशनचे सचिव अनुप नाईक यांनी दिली.
स्पर्धेत २५ राज्यातून ३०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्युनिअर, सिनीअर, युथ आणि मास्टर गटात मुले आणि मुलींच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये युथ गटात ४० ते ८७ पेक्षा अधिक वजनी गटात स्पर्धा होणार आहेत. ज्युनिअर गटात ४४ ते १०० पेक्षा अधिक वजनी गटात, सिनीअर गटात ५२ ते १०० पेक्षा अधिक आणि मास्टर गटात ६२ ते १०० पेक्षा अधिक वजनी गटात स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेच्या अंतिम लढती आणि पारितोषिक वितरण समारंभ २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून अंतिम लढती सुरु होणार असून पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी उद्योजक तात्यासाहेब भिंताडे, उद्योजक निलेश भिंताडे, गणेश भिंताडे, नगरसेविका वर्षा तापकिर, प्रसाद शेंडे उपस्थित राहणार आहेत.