पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारी (२६ मार्च) दुसरा वनडे सामना झाला. हा सामना इंग्लंड संघाने ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी २० षटकारांची बरसात केली. त्यामुळे एक खास विक्रम झाला आहे.
इंग्लंडकडून बेन स्टोक्सने १०, जेसन रॉयने १, जॉनी बेअरस्टोने ७ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २ असे मिळून एकूण २० षटकार मारण्यात आले. त्यामुळे वनडेमध्ये एका डावात २० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याची ही चौथी वेळ होती. चारवेळा असा कारनामा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ आहे. विशेष म्हणजे इंग्लंडने गेल्या २ वर्षात चारवेळा एका सामन्यात २० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
इंग्लंडशिवाय वनडे सामन्याच्या एका डावात २० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा कारनामा वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांना करता आला आहे. वेस्ट इंडिजने २ वेळा आणि न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या संघांना प्रत्येकी १ वेळा करता आला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात २० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारे संघ
४ वेळा – इंग्लंड
२ वेळा – वेस्ट इंडिज
१ वेळा – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
इंग्लंडने मिळवला विजय –
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारतीय संघानेही याचा फायदा घेत ५० षटकात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३३७ धावांचे आव्हान दिले. भारताकडून केएल राहुलने १०८ धावांची शतकी खेळी केली. तर रिषभ पंतने ७ षटकारांसह आक्रमक ७७ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून रिस टोप्ली आणि टॉम करनने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने ११० धावांची भागीदारी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. जेसन रॉय ५५ धावांवर बाद झाला.
त्याच्यानंतर बेअरस्टोला बेन स्टोक्सने शानदार साथ दिली. स्टोक्स आणि बेअरस्टोमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने इंग्लंडचा विजयाचा मार्ग सोपा केला. स्टोक्स ९९ धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी तुटली. त्याच्यापाठोपाठ बेअरस्टो १२४ धावा करुन बाद झाला. पण तो पर्यंत इंग्लंडसाठी विजय दृष्टीक्षेपात आला होता.
अखेर डेव्हिड मलानने नाबाद १६ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद २७ धावाकरत इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला असल्याने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (२८ मार्च) होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धू धू धुतलं! स्टोक्सने ५२ चेंडूत ठोकले १० खणखणीत षटकार, ‘या’ फलंदाजांची केली बरोबरी
दुर्दैवी बेन स्टोक्स, अवघ्या एका धावेने हुकले वनडे शतक; नकोशा यादीत झाला समावेश
भारताला गेल्या ४० दिवसात मिळाले पाच चमकदार खेळाडू, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात केली दमदार कामगिरी