मुंबई। गुरुवारी (१५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील सातवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. या आमंत्रणाचा स्विकार करत दिल्लीने २० षटकांत ८ बाद १४७ धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
डिविलियर्स, धोनीला टाकले मागे
साल २०१७ पासून आयपीएलमध्ये ४ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना पंतने १२ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे २०१७ पासून आयपीएलमध्ये ४ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो अव्वल क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याने एबी डिविलियर्स, एमएस धोनी सारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.
एबी डिविलियर्सने २०१७ पासून आयपीएलमध्ये ४ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना ९ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर एमएस धोनी आणि दिनेश कार्तिकने प्रत्येकी ७ वेळा २०१७ पासून ४ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
पंतच्या अर्धशतकामुळे दिल्लीला दिलासा
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने ३७ धावांतच ३ विकेट्स गमावले होते. अशा परिस्थितीत पंतने कर्णधाराला साजेशी अशी अर्धशतकी खेळी केली. त्याने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर तो जास्तवेळ टिकू शकला नाही. तो १३ व्या षटकात एकेरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. रियान परागने पंत क्रिजमध्ये परतण्याआधीच थेट स्टंपवर चेंडू मारत त्याला धावबाद केले. पंत ३२ चेंडूत ९ चौकारांसह ५१ धावा करुन बाद झाला.
त्याच्या या अर्धशतकामुळे दिल्लीला प्रथम फलंदाजी करताना १४७ धावांचा टप्पा गाठता आला. पंतनंतर दिल्लीकडून टॉम करनने सर्वाधिक २१ धावांची खेळी केली. तर ललित यादवने २० धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त दिल्लीकडून फलंदाजीत कोणालाही खास कामगिरी करता आली नाही. राजस्थानकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ विषयावर रिकी पाँटिंग आणि पृथ्वी शॉमध्ये होते सर्वात जास्त चर्चा
टीम इंडियाचे ‘हे’ २८ खेळाडू होणार करोडपती, बीसीसीआयच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा
आरसीबीत सामील होताच चमकलं ‘मॅक्स’भाऊचं नशीब; मागील ३ वर्षात न जमलेला पराक्रम अवघ्या २ सामन्यात केला