रांची। आजपासून(19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या या सामन्यातील आज पहिल्या दिवसाचा खेळ पावसाचा व्यत्यय आल्याने 58 षटकांनंतर थांबवण्यात आला आहे.
या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 3 बाद 224 धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली. त्याने पहिल्या दिवसाखेर 164 चेंडूत नाबाद 117 धावा केल्या आहेत.
रोहितचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2019 या वर्षातील सलामीवीर म्हणून एकूण 9 वे शतक आहे. त्यामुळे त्याने एका वर्षात सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
त्याच्याआधी सलामीवीर फलंदाज म्हणून एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 शतके करण्याचा पराक्रम सचिन तेंडूलकर, ग्रॅमी स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी केला आहे. त्यामुळे आता या दिग्गजांच्या यादीत रोहितचाही समावेश झाला आहे.
रोहितने सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीला खेळताना तिसरे शतक केले आहे. याआधी त्याने यावर्षी 2019 च्या वनडे विश्वचषकात 5 शतके केली होती.
तसेच त्याआधी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. अशी मिळून त्याने यावर्षी एकूण 9 शतके सलमीवीर म्हणून केली आहेत.
सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत पहिल्या दिवसाखेर रोहितबरोबर अजिंक्य रहाणे फलंदाजी करत असून त्याने अर्धशतक पूर्ण करताना 135 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे सलामीवीर फलंदाज –
9 – सचिन तेंडूलकर – 1998
9 – ग्रॅमी स्मिथ – 2005
9 – डेव्हिड वॉर्नर – 2016
9 – रोहित शर्मा – 2019
8 – गॅरी कर्स्टन – 1996