यावर्षी इंडियन प्रीमीयर लीग (IPL 2022) स्पर्धेचा १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. हा हंगाम अनेक गोष्टींसाठी वेगळा असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हंगामापासून १० संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापूर्वी गेल्या अनेकवर्षांपासून ८ संघ स्पर्धा खेळत होते. पण आता गुजराज टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नवीन संघांचा समावेश झाला आहे. तसेच या हंगामापूर्वी मेगा लिलाव पार पडला, त्यामुळे प्रत्येक संघ नव्याने तयार झाला आहे.
स्टार आणि युवा खेळाडूंवर लागली मोठी बोली
बंगळुरू येथे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२२ लिलाव (IPL Auction 2022) पार पडला. या लिलावात अनेक स्टार आणि युवा खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लागल्याचे पाहायला मिळाले, तर अनेक दिग्गज खेळाडूंवर कोणीही बोली लावली नसल्याचेही दिसले.
दोन दिवस पार पडलेल्या या लिलावात एकूण ६०० खेळाडूंचा समावेश होता. मात्र, त्यातील फक्त २०४ खेळाडूंवर बोली लागली. यातील ६७ खेळाडू परदेशी आहेत. तसेच १० संघांनी मिळून या लिलावात तब्बल ५५१ कोटी रुपये खर्च केले.
लिलावात ११ खेळाडूची कोटीच्या कोटी उड्डाणे
आयपीएल लिलावात ज्या २०४ खेळाडूंवर बोली लागली, त्यातील ११ खेळाडू असे आहेत, ज्यांच्यासाठी वेगवेगळ्या संघांनी १० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे. यावर्षी लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो, युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपये मोजले. त्यामुळे इशान आयपीएल लिलाव इतिहासातील मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
त्याच्यानंतर या लिलावात सर्वाधिक बोली लागली ती वेगवान गोलंदाज दीपक चाहरला. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाने १४ कोटी रुपये खर्च केले. यंदाच्या लिलावात सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये भारतीय खेळाडूंचाच बोलबाला राहिला. तिसऱ्या क्रमांकावर या यादीत श्रेयस अय्यर राहिला. त्याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटी रुपये मोजले.
तसेच लियाम लिव्हिंगस्टोन या लिलावातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्सने ११.५० कोटींसह आपल्या संघात सामील करून घेतले. त्याच्याव्यतिरिक्त आणखी ३ परदेशी खेळाडूंनाही या लिलावात १० कोटींपेक्षा जास्त रकमेची बोली लागली. आता या लिलावानंतर प्रत्येक संघांची संघबांधणी जवळपास पूर्ण झाली आहे.
आयपीएल २०२२ लिलावातील सर्वात महागडे खेळाडू (Most Expensive Players in IPL 2022 Auction)
इशान किशन – १५.२५ कोटी – मुंबई इंडियन्स
दीपक चाहर – १४ कोटी – चेन्नई सुपर किंग्स
श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
लियाम लिव्हिंगस्टोन – ११.५० कोटी – पंजाब किंग्स
शार्दुल ठाकूर – १०.७५ कोटी – दिल्ली कॅपिटल्स
हर्षल पटेल – १०.७५ कोटी – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
वनिंदू हसरंगा – १०.७५ कोटी – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
निकोलस पूरन – १०.७५ कोटी – सनरायझर्स हैदराबाद
लॉकी फर्ग्युसन – १० कोटी – गुजरात टायटन्स
प्रसिद्ध कृष्णा – १० कोटी – राजस्थान रॉयल्स
अवेश खान – १० कोटी – लखनऊ सुपरजायंट्स
महत्त्वाच्या बातम्या –
स्टीव्ह स्मिथचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहून सर्वच झाले आश्चर्यचकित, पाहा व्हिडिओ
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा
प्रेमासाठी काहीपण! भारताचा ‘जंबो’ गोलंदाज कुंबळेने प्रेमासाठी दिली होती न्यायालयीन लढाई