fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात तब्बल 6 खेळाडू प्रथम श्रेणीमधील त्रिशतकवीर आहेत.

यामध्ये मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे. या सहाही जणांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्रिशतक केले आहे.

मयंकने 2017-18 च्या रणजी ट्रॉफी मोसमात महाराष्ट्र विरुद्ध नाबाद 304 धावांची खेळी केली होती. ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

त्याचबरोबर रविंद्र जडेजाने तर प्रथम श्रेणीमध्ये 3 त्रिशतके केली आहेत. जडेजा प्रथम श्रेणीमध्ये तीन त्रिशतके करणारा पहिला भारतीय आणि एकूण 8 वा खेळाडू आहे. त्याने पहिल्यांदा 2011 ला ओडीशा विरुद्ध 314 धावा , दुसऱ्यांदा गुजरात विरुद्ध 303 धावा आणि 2012 मध्ये तिसऱ्यांदा रेल्वेविरुद्ध 313 धावा करत तीन त्रिशतके करण्याचा पराक्रम केला.

रिषभ पंत हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा वासिम जाफर आणि अभिनव मुकुंद नंतरचा तिसराच सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला. तर जगातील चौथा खेळाडू ठरला. त्याने 19 वर्षे 12 दिवसांचा असताना महाराष्ट्राविरुद्ध 2016ला मुंबईत रणजी ट्रॉफी स्पर्धेत 326 चेंडूत 308 धावा केल्या होत्या.

याबरोबरच रोहित शर्माने डिसेंबर 2009 मध्ये मुंबईकडून 5 व्या क्रमांकावर गुजरात विरुद्ध खेळताना नाबाद 309 धावांची खेळी केली होती. ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे. विशेष म्हणजे रोहितने वनडे क्रिकेटमध्येही 3 द्विशतके केली आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

चेतेश्वर पुजाराला टेस्ट स्पेशालिस्ट म्हणूनच ओळखले जाते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळताना दोन त्रिशतके केली आहेत. त्याने पहिल्यांदा 2008 मध्ये ओडिशा विरुद्ध नाबाद 302 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने 2013 मध्ये कर्नाटक विरुद्ध 352 धावांची खेळी केली होती.

भारतीय संघातून काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीने ऑक्टोबर 2017 मध्ये ओडिसा विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या सामन्यात आंध्रप्रदेश कडून खेळताना नाबाद 302 धावा केल्या आहेत. ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

भारताच्या संघात हे सहा खेळाडू जरी त्रिशतकवीर असले तरी मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना मात्र अजून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक करता आलेले नाही. विराटची प्रथम श्रेणीमधील सर्वोच्च धावसंख्या ही 243 अशी आहे. तर रहाणेची नाबाद 265 धावा ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटीत गोलंदाजाने केवळ १५ चेंडूत घेतल्या ६ विकेट्स

शतक तर पुजाराने केले परंतु ही गोष्ट करुन कायम नाव इतिहासात कोरले

फक्त सचिनचेच नाही तर द्रविडचेही विक्रम मोडतोय विराट

You might also like