आयपीएल २०२० चा १५ वा सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) अबू धाबी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना बेंगलोर संघाने ८ विकेट्सने जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थान संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ६ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. या धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बेंगलोर संघाचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने एक कारनामा केला आहे.
बेंगलोर संघाकडून फलंदाजी करताना पडिक्कलने धडाकेबाज कामगिरी करत अर्धशतकी खेळी केली. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ६३ धावा ठोकल्या. यामध्ये १ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. या खेळीसह तो बेंगलोर संघाकडून खेळताना पहिल्या ४ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने बेंगलोर संघासाठी पहिल्या ४ डावात १७४ धावा ठोकल्या आहेत.
याबाबतीत त्याने रॉस टेलर (१४९), श्रीवत्स गोस्वामी (१२५), मनीष पांडे (११६) आणि वसीम जाफर (११०) या खेळाडूंना मागे टाकले आहे.
पडिक्कलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४३.५० च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये बेंगलोर संघाकडून पहिल्या ४ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१७४* धावा- देवदत्त पडिक्कल
१४९ धावा- रॉस टेलर
१२५ धावा- श्रीवत्स गोस्वामी
११६ धावा- मनीष पांडे
११० धावा- वसीम जाफर