भारतीय संघाने पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचा गड आपल्याकडेच राखला. सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झाली. हा सामना दोन्ही संघांच्या सहमतीने अनिर्णित ठरला. यासह भारताने मालिका 2-1ने नावावर केली. या मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दमदार कामगिरीसाठी भारताचे धुरंधर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. अशात या लेखातून आपण या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांचा आढावा घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते धुरंधर…
चौथ्या सामन्याचा आढावा
ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी पहिल्या तीन कसोटीत जी फलंदाजी जमली नाही, ती खास फलंदाजी चौथ्या कसोटीत केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. या डावात भारतीय अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) याने सर्वाधिक 6 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी 2, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
यानंतर भारताने फलंदाजी करताना 571 धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नेथन लायन आणि टॉड मर्फी चमकले. त्यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुह्नेमन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 विकेट्स गमावत 168 धावा केल्या. यातील प्रत्येकी एक विकेट आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी घेतली.
मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
अशाप्रकारे चौथ्या सामन्यातील दोन्ही डावात मिळून 7 विकेट्स घेणारा आर अश्विन मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. अश्विनने या संपूर्ण मालिकेत 17.28च्या सरासरीने आणि 2.59च्या इकॉनॉमी रेटने 25 विकेट्स घेतल्या. या यादीत दुसऱ्या स्थानी भारताचाच अष्टपैलू रवींद्र जडेजा असून त्याने 18.86च्या सरासरीने आणि 2.57च्या इकॉनॉमी रेटने 22 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, जडेजासह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नेथन लायन आहे. त्याने 22.36च्या सरासरीने आणि 2.59च्या इकॉनॉमी रेटने 22 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर फिरकीपटू टॉड मर्फी असून त्याने 25.21च्या सरासरीने आणि 2.56च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (most wickets in Border-Gavaskar Series 2023)
25 विकेट्स- आर अश्विन
22 विकेट्स- रवींद्र जडेजा
22 विकेट्स- नेथन लायन
14 विकेट्स- टॉड मर्फी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा, पण टीम इंडियाचा कुठं! मागील चारही BGT मालिकेवर भारताने कोरलंय आपलं नाव, पाहा निकाल
आयसीसी पुरस्कार अन् जडेजाच्या मध्ये ‘हा’ इंग्लिश खेळाडू बनला काटा, सलग दुसऱ्यांदा मारली बाजी