मुंबई, दि. 8 (क्री.प्र.)- बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या ब गटात रत्नदिप क्रीडा मंडळ विरूद्ध श्री शंभूराजे क्रीडा मंडळ यांच्यात विजेते पदासाठी मुकाबला होईल.
उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत रत्नदिप क्रीडा मंडळाने संभाजी क्रीडा मंडळाचे आव्हान ५-५ चढायांच्या ज्यादा डावात परतवून लावले. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघाचे ३३-३३ असे समान गुण झाले त्यामुळे सामन्याचा निकाल ५-५ चढायांच्या ज्यादा डावात लावण्यात आला. त्यामध्ये रत्नदिपने शेवटी बाजी मारली. विजयी संघाच्या चेतन खांगटने तुफानी चढाया केल्या त्याला रुद्र ठूलने सुरेख पकडी करून चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या संकेत केम्बले आणि साहिल दळवी यांची झुंज अपयशी ठरली. याच गटात दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विकास गोरिवले, जयेश शेट्टी यांच्या शानदार खेळाच्या जोरावर श्री शंभूराजे क्रीडा मंडळाने नेताजी सुभाषचंद्र बोस संघाचा ३०-१९ गुणांनी सहज पराभव केला. पराभूत संघातर्फे संतोष कांबळे, गुरू सुर्वे यांची लढत एकाकी ठरली.
पुरुषांच्या अ गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघर्षने नवजीवन क्रीडा मंडळाला २८-१६ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीत मजल मारली. संघर्षच्या दिपकने तुफानी चढाया करून नवजीवनचे क्षेत्ररक्षण मोडीत काढले. अश्विन देसाई ने झकास पकडी करून प्रेक्षकांची दाद मिळवली. पराभूत संघाच्या अक्षय बंगेरा, सागर राणे यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले.
महिला विभागात वंदेमातरम् आणि ओम नव महाराष्ट्र यांच्यात विजेते पदासाठी मुकाबला होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यात ओम नव महाराष्ट्राने सह्याद्री संघावर ३१-१० गुणांनी सहज विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात वंदेमातरम् नेदेखील जगदंब संघावर एकतर्फी लढतीत ३४-१० गुणांनी आरामात विजय मिळवला. (MP Kabaddi Cup | Final fight between Ratnadeep and Shri Shambhuraj Sports Board)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING: पुण्याचा अभिजीत कटके ठरला हिंदकेसरी 2022 चा मानकरी
सिडनी कसोटीत 195 धावांवर नाबाद परतलेला उस्मान ख्वाजा, द्विशतकाविषयी दिली मोठी प्रतिक्रिया