महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीत सततच्या पावसामुळे राखीव दिवशी सुद्धा पूर्ण खेळ होऊ शकला नाही. परंतु गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या रत्नागिरी जेट्स संघाने विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच पाच खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊया.
1. अर्शिन कुलकर्णी
एमपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये ईगल नाशिक टायटन्स संघाचा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी याचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. अर्शिन स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. अर्शिनने खेळलेल्या फक्त 3 सामन्यात 65 च्या सरासरीने 195 धावा चोपल्या. यामध्ये एका शतकाचाही समावेश होता. याव्यतिरिक्त मध्यमगती गोलंदाज करताना सहा बळी देखील त्याने टिपले. पुढील वर्षी होत असलेल्या अंडर 19 विश्वचषकात तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो.
2. धनराज शिंदे
ईगल नाशिक टायटन्सचा फिनिशर म्हणून धनराज शिंदे याने या स्पर्धेत आपली विशेष ओळख बनवली. या स्पर्धेत 192 अशा सर्वाधिक स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्याने 5 सामन्यात 162 धावा फटकाविल्या. त्याच्या फलंदाजीची शैली पाहता तो पुढील वर्षी आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
3. पियुष साळवी
पुणेरी बाप्पा संघाचा युवा वेगवान गोलंदाज पियुष साळवी याचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले आहे. वेग आणि स्लोअर चेंडू यांचा सुरेख मेळ साधत त्याने या स्पर्धेत 11 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे अनेक आयपीएल संघांची त्याच्यावर नजर पडली असेल.
4. मनोज यादव
कोल्हापूर टस्कर्सचा वेगवान गोलंदाज मनोज यादव हा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट म्हणून ओळखला गेला. त्याच्या नावे स्पर्धेत नऊ बळी जमा झाले. विशेष म्हणजे स्पर्धेतील एकमेव हॅट्रिक त्यानेच घेतली. अंतिम षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीने तो लक्षवेधी ठरला.
5. कुणाल थोरात
रत्नागिरी जेट्स संघाचा फिरकीपटू कुणाल थोरात हा आपल्या कंजूस गोलंदाजीसाठी ओळखला गेला. त्याने प्रत्येक सामन्यात बळी आपल्या नावे केले. सातपेक्षा कमी धावांच्या इकॉनॉमी रेटने त्याने सहा बळी मिळवले. तसेच, अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना तो उठून दिसला.
(MPL 2023 Emerging Players Arshin Kulkarni Piyush Salvi Dhanraj Shinde)
महत्वाच्या बातम्या-
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा
MPL 2023 गाजवलेले टॉप फाईव्ह धुरंधर! क्रिकेटजगताला घ्यायला लावली आपली दखल