भारतीय संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनी नेहमीच हटके गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानावर आश्चर्यकारक निर्णय घेऊन प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडणे, हे धोनीचे वैशिष्ट्य होते. २०२० साली संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये असताना धोनीने मैदानाबाहेरही आपण हटके गोष्टी करू शकतो, याचा प्रत्यय दिला होता. लॉकडाऊन दरम्यान त्याने रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या याच शेतीतील भाज्या आता प्रत्यक्ष परदेशात विकल्या जाणार आहेत.
झारखंडमधील शेतकऱ्यांना होणार फायदा
माध्यमांतील वृत्तांनुसार, झारखंडच्या कृषी विभागाने धोनीच्या शेतातील भाज्या परदेशात विकण्याची परवनगी दिली आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरात ऑल सीजन फ्रेश एजन्सी या भाज्या विकणार आहे. या एजन्सीच्या माध्यमातून कृषी विभागाने खाडी देशात भाज्या विकल्या आहेत.
बाजार समितीचे सचिव अभिषेक आनंद याविषयी बोलताना म्हणाले की, “धोनी हा खूप मोठा ब्रँड आहे. परदेशात त्याच्या भाज्या विकल्या गेल्यास त्याच्यासह झारखंडचेही नाव जोडले जाईल. यामुळे येथील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल. सुरुवातीला या एजन्सीने झारखंडमध्ये येण्यास नकार दिला होता. पण धोनीचे नाव जोडले गेल्यामुळे ते आता झारखंडमधील भाज्या परदेशात विकण्यास तयार झाले आहेत.”
स्वस्त दरात मिळतात धोनीच्या शेतातील भाज्या
धोनीचे फार्म हाऊस ५५ एकरमध्ये परसलेले आहे. येथेच तो स्ट्रॉबेरी, फुलकोबी, टोमॅटो, वाटाणे यांची शेती करतो. धोनीच्या सेंद्रीय शेतातील भाज्या बाजारात उपलब्ध झाल्यापासून ग्राहकांची त्याला मोठी मागणी आहे. धोनीने मात्र व्यवसायात स्थिरावण्यासाठी आपल्या उत्पादनाची किंमत बाजारभावाच्या तुलनेत कमी ठेवणे पसंत केले आहे. रांची येथील फळबाजाराच्या जवळच धोनीच्या शेतातील भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यापैकी फुलकोबी १० रुपये किलो दराने, तर टोमॅटो ३० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. मात्र, होलसेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किंमतीत सूटही देण्यात येत आहे.
धोनीच्या डेअरीतील दुधालाही मोठी मागणी
धोनीने काही काळापूर्वी धुर्वा सेंबो येथील फार्म हाऊसमध्ये शेतीबरोबर डेअरीचे कामही सुरू केले होते. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी लालपुर येथे असलेल्या धोनीच्या डेअरीवर खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून आली. येथे दररोज सकाळी व संध्याकाशी फ्रिजन आणि साहिवाल गायींचे दुध विकले जाते. दररोज तब्बल २७० किलो दूध लालपुर येथे पाठवण्यात येते. फ्रिजन गायीचे दूध ५५ रुपये आणि साहिवाल गायीचे दूध ८० रुपये किलो किंमतीने विकले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडीओ- अखेर क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने सुरु केली ऑरगॅनिक शेती, ट्रॅक्टरने केली…
…म्हणून धोनीच्या शेतातील भाज्यांची किंमत आहे स्वस्त; घ्या जाणून
धोनीच्या फार्म हाऊसमधील टोमॅटो आणि दुधाची विक्री झाली सुरू; किंमती घ्या जाणून