इंग्लंड संघाचा माजी फलंदाज केविन पीटरसनने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी तो म्हणाला की, २ वेळा भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देणारा धोनी आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे.
त्याचबरोबर तो पुढे म्हणाला की, धोनीच्या (MS Dhoni) महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अशक्य आहे. निश्चितच तो जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला की, “धोनीकडून खूप साऱ्या अपेक्षा केल्या जात होत्या. असे असूनही भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व करताना त्याने जे काही मिळविले आहे, ते खूप आश्चर्यकारक आहे.”
धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वात भारताने २०१३मध्ये चँपियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती. इतकेच नव्हे तर, आयपीएलमध्ये त्याने आपल्या चेन्नई संघालाही २०१०, २०११ आणि २०१८चे विजेतेपद मिळवून दिले होते.
धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने ५०.५८ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने टी२०त ३७.६ च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत.
जुलै २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव मिळाल्यानंतर धोनीने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल २०२०मध्ये तो चमकदार कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन करणार होता. परंतु यादरम्यान कोविड-१९ या व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा ‘पंचगिरी’ करताना दिसणार नाही हे दोन महान अंपायर
-धोनी नसेल तर चेन्नई सुपर किंग्जचं काही खरं नाही
-गंभीर म्हणतो, फक्त हा खेळाडू संघात हवा होता, केकेआरने जिंकली असती अनेक विजेतेपदं