भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी किती बाईकप्रेमी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्याने आपल्या रांची येथील फार्म हाऊसमध्ये बाईक्ससाठी एक स्वतंत्र गॅरेज बनवले आहे. त्या गॅरेजच्या चारही बाजूंना आरसे आहेत. त्यात त्याने अनेक बाईक्स ठेवल्या आहेत. लॉकडाऊनदरम्यान धोनी आपली जूनी बाईक Yamaha देखील चालवताना दिसला होता.
धोनीने (MS Dhoni) लॉकडाऊनमध्ये काय काय केले, हे धोनीच्या चाहत्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, याचे उत्तर त्याची पत्नी साक्षी धोनीनकडून (Sakshi Dhoni) मिळाले. खरंतर रविवारी (३१ मे) साक्षी पहिल्यांदा इंस्टाग्राम लाईव्ह (Instagram Live) चॅटमार्फत संवाद साधत होती. त्यादरम्यान तिने धोनीबद्दल खुलासा केला आहे.
“हा माझा पहिला इंस्टाग्राम लाईव्ह आहे. मला माही (धोनी) म्हणाला की, काही हरकत नाही कर. माझ्या इंस्टाग्रामवर सर्व चाहते माझे नसून धोनीचे आहेत. त्यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आम्ही लॉकडाऊनमध्ये घरातच वेळ घालवत आहोत. केवळ माहीच क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी जातो. माहीने लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान ७ बाईक्स दुरूस्त (Assemble) केल्या आहेत. सर्व गाड्यांचे पार्ट्स वेगवेगळे करत त्याने स्वत:च पुन्हा जोडले आहेत,” असे चेन्नई सुपर किंग्जबरोबरच्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान साक्षीने म्हटले.
यादरम्यान साक्षीने एक मजेशीर गोष्टही सांगितली. खरंतर धोनीने एक बाईक पूर्ण दुरूस्त केली. परंतु एक पार्ट लावायला विसरला. ती म्हणाली की, “एक बाईक सुरु झालीच नाही. तो मला म्हणाला की, मी सर्वकाही केले. परंतु एक वस्तू तुटली. दुसऱ्या दिवशी माही पुन्हा आपल्या कामाला लागला. यावरून समजते की तो परिपूर्ण (परफेक्ट) नाहीये. तोदेखील इतर लोकांप्रमाणे सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण नाही.”