fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

माजी कर्णधार एमएस धोनी तिसऱ्या कसोटीत दिसणार

उद्यापासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रांची हे धोनीचे घरचे मैदान आहे.

या सामन्यात धोनीच्या उपस्थितीबद्दल धोनीचा व्यवस्थापक आणि झारखंडचा माजी कर्णधार मिहिर दिवाकर यांनी पीटीआयला सांगितले की ‘माही नक्कीच येईल आणि तूम्ही त्याला उद्या पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान पाहू शकता. मी त्याच्याबरोबर मुंबईमध्ये होतो आणि तो उद्या सकाळी रांचीला येत आहे.’

त्याचबरोबर झारखंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नफीस खान यांनी धोनीच्या कुटुंबियांना आमंत्रणही दिले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही त्याच्या कुटुंबाला आमंत्रण दिले आहे. हे स्टेडीयम त्यांचेच तर आहे. त्याचे कधीही स्वागतच आहे.’

धोनीने याआधीच डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तसेच तो 2019 च्या विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर भारताकडून खेळलेला नाही. तेव्हापासून त्याने विश्रांती घेतलेली आहे.

तसेच सध्या भारत-दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून 2-0 ने आघाडीवर आहे.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला शेवटचा कसोटी सामन्यात जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. तर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरेल.

याआधी भारताचा रांचीमध्ये 1 कसोटी सामना झाला आहे. हा सामना 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.

You might also like