इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामापूर्वी, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूलने चार वेळचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्सबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली. तो म्हणाला की आयपीएल २०२२ मध्ये, सीएसके कर्णधार एमएस धोनी आपला शेवटचा सामना खेळेल आणि हंगामाच्या मध्यात फाफ डू प्लेसिसकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाईल.
एका कार्यक्रमादरम्यान, तो म्हणाला, “एमएसला त्याचा शेवटचा सामना खेळण्यासाठी आणले जाईल. प्लेसिस पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये आयपीएलदरम्यान चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारेल. हा माझा विचार आहे. मला वाटत नाही की एमएस धोनी संपूर्ण हंगामात खेळेल.”
तो म्हणाला, “मला वाटते की हंगामाच्या एखाद्या टप्प्यावर फ्लेसिस पदभार स्वीकारेल. पण त्याआधी चेन्नईमध्ये एखादा सामना होईल त्या सामन्यात धोनी आपली निवृत्ती जाहीर करेल. त्यानंतर प्लेसिस कर्णधारपद स्वीकारेल.” न्यूझीलंडच्या या माजी खेळाडूने असेही सांगितले की, प्लेसिस आणि धोनी व्यतिरिक्त सीएसके मेगा लिलावापूर्वी रवींद्र जडेजा व ऋतुराज गायकवाड यांना रिटेन करेल.
सीएसकेने एमएस धोनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, धोनी पुढील वर्षी सीएसकेकडून खेळणार आहे. धोनीसोबत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनाही चेन्नई सुपर किंग्सने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपला सर्वात यशस्वी फलंदाज सुरेश रैनाला संघाने मुक्त केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा रिटेन केलेला चौथा खेळाडू कोण असेल याचा निर्णय अद्याप झालेला नाही. एका वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स मोईन अलीला कायम ठेवू इच्छित आहे. तो यास सहमत आहे की नाही हे अद्याप ठरलेले नाही. जर मोईन अली सहमत नसेल तर सीएसके सॅम करनला कायम ठेवू शकते. फ्रँचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करायची आहे. सर्व फ्रँचायझी फक्त चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. ज्यामध्ये तीन भारतीय आणि एका विदेशी खेळाडूचा समावेश असेल.