बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा शुभारंभ होऊन ३ दिवस लोटले आहेत. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामातील पहिली लढत झाली होती. या चुरसीच्या लढतीत बेंगलोरने गतविजेत्या मुंबईला २ विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. परंतु या पराभवातून धडे घेत मुंबईचे शिलेदार पुढील सामन्यासाठी जोमाने तयारी करत आहेत.
यावेळी सराव सत्रात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा कसून घाम गाळताना दिसला. परंतु यावेळी तो फार क्वचितच करणाऱ्या एका गोष्टीचा सराव करत होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सने रोहितच्या व्हिडिओला भन्नाट एडिटिंग करत चाहत्यांच्या भेटीस आणले आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित हाती बॅट नव्हे तर चेंडू घेऊन दिसत आहे. अर्थातच तो गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. फलंदाजीत हातखंडा असलेला हिटमॅन कधी गोलंदाजी करताना दिसला, तर त्याच्या चाहत्यांच्या त्याच्यावर नजरा खिळणे साहजिक आहे.
याच कारणामुळे मुंबई इंडियन्सने या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करें’ हे हिंदी गाणे जोडले आहे. याबरोबरच कॅप्शनमध्येही ‘जेव्हा तुम्ही रोहितला गोलंदाजी करताना पाहता- तेव्हा तुमच्या डोक्यातही हेच गाणे येईल,’ असे लिहिले आहे.
मुंबई विरुद्ध बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावत १५९ धावा केल्या होत्या. हे लक्ष्य जरी जास्त मोठे नसले तरी जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, कृणाल पंड्या अशा अनुभवी गोलंदाजांमुळे मुंबई सामना जिंकणार असे वाटत होते.
परंतु राहुल चाहरने ४ षटकात ४३ धावा देत अतिशय महागडी गोलंदाजी केली. दरम्यान त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नाही. इतर गोलंदाजांनी मिळून बेंगलोरचे ८ बळी बाद केले. परंतु अखेर बेंगलोरने २ विकेट्सने सामना खिशात घातला.
कदाचित पुढील सामन्यात गरज भासल्यास आपल्यालाही कामचलाऊ गोलंदाजी करता यावी, यामुळे रोहित सराव सत्रात थोडाफार गोलंदाजीत आजमावत असेल. मुंबईचा आगामी आयपीएल सामना १३ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘वेल डन बॉइज,’ कोलकाता संघाची हैदराबादविरुद्ध विजयी सेंच्यूरी; संघमालकाने केलं तोंडभरुन कौतुक
‘माझ्यासाठी आयपीएल म्हणजेच…,’ आंद्रे रसेलच्या त्या विधानाने जिंकली कोट्यावधी भारतीयांची मने
मुंबई इंडियन्सला गवसला कोहिनूर! धाकट्या भावानंतर थोरल्याला दिली जागा, ‘अशी’ राहिलीय त्याची कामगिरी