महालक्ष्मी, भवांनीमाता, यंग प्रभादेवी, अमर यांनी मुंबई शहरं कबड्डी असो. ने मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाने पुरस्कृत केलेल्या किशोर गट कबड्डी स्पर्धेत आगेकूच केली.
वडाळा येथील शारीरिक शिक्षण मंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या सामन्यात महालक्ष्मीने हौशी बालमित्रचे आव्हान ५९-४०असे परतवीत आगेकूच केली.
संतोष वाईगडे, धीरज राऊत यांच्या चढाई पकडीच्या खेळामुळे मध्यांतराला विजेत्या संघाकडे ३४-१५अशी आघाडी होती.
नंतर मात्र हौशी बालमित्रच्या प्रथमेश वाघ, शिवम कुलये यांनी सामन्यात रंगत आणली, पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले.
भवानीमाताने विजय बजरंगला ४४-२२असे सहज पराभूत केले. विश्रांतीला २९-०७अशी आघाडी घेणाऱ्या भवणीमाताने दोन्ही डावात आपले वर्चश्व राखले.
सुशांत धावडे,सिद्धेश परब यांच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बजरंगचा साईराज शाहू एकाकी लढला. यंग प्रभादेवीने नवं महाराष्ट्राचा ५३-१६असा धुव्वा उडविला.
सचिन माधव, प्रितेश बेलेकर यांना थोपविणे नवं महाराष्ट्राला जमले नाही. त्यांचा विराज पवार बरा खेळला.
अमरने शिवसाईला ५३-४९असे रोखले. मध्यांतराला दोन्ही संघ १८-१८असे बरोबरीत होते. मध्यांतरानंतर मात्र अमरच्या साहिल रितांमे, आदित्य विगोले यांनी टॉप गिअर टाकत बाजी पलटविली.
शिवसाईचा निहार वाघमारे, साईल कसबे यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला. वंदे मातरम वि वि जय भवानी सार्व. उत्सव मंडळ (६३-२५), दुर्गामाता वि वि डॉ.आंबेडकर (५१-१४), भवानीमाता वि वि महाराष्ट्र स्पोर्ट्स (४४-०७).