गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील पहिल्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत मुंबई सिटी एफसीने सडनडेथमध्ये एफसी गोवा संघाला 6-5 असे हरवून अंतिम फेरीत धडक मारली. सडनडेथमध्ये गोव्याकडून नववी पेनल्टी ग्लेन मार्टिन्सने दवडली. त्यानंतर मुंबईच्या रॉलीन बोर्जेस याने अचूक फटका मारला. त्यामुळे मुंबई सिटीचा विजय नक्की झाला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती, जी निर्धारीत तसेच अतिरीक्त वेळेत सुटू शकली नाही. शूटआऊटसाठी दोन्ही संघांनी गोलरक्षक बदलले. गोव्याने अतिरीक्त वेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना धीरज सिंग याच्याऐवजी नवीन कुमारला पाचारण केले. मुंबईने अमरींदर सिंग याच्याऐवजी फुर्बा लाचेन्पा याला पेनल्टीसाठी पाचारण केले.
शुट-आऊटमध्ये गोव्याकडून कर्णधार एदू बेदिया याने घेतलेली पहिलीच पेनल्टी फुर्बाने रोखली. त्यानंतर मुंबईच्या बार्थोलम्यू ओगबेचे याने अचूक फटका मारला. गोव्याकडून दुसरी पेनल्टी ब्रँडन फर्नांडीस याने दवडली. त्याने मारलेला चेंडू क्रॉसबारला लागला. त्यानंतर मुंबईच्या हर्नान सँटानाचा फटका नवीन कुमारने अडविला. गोव्याकडून तिसरी पेनल्टी अनुभवी ईगोर अँग्युलो याने सत्कारणी लावली. मग मुंबईकडून तिसरी पेनल्टी ह्युगो बुमूस याने दवडली. त्याने सरळ मारलेला चेंडू नवीनने रोखला. गोव्याकडून चौथी पेनल्टी सत्कारणी लावत इव्हान गोंझालेझने संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मुंबईकडून चौथी पेनल्टी रेनीयर फर्नांडीसने अचूकपणे मारली. त्यामुळे 2-2 अशी बरोबरी झाली.
गोव्याकडून पाचवी पेनल्टी जेम्स डोनाचीने दवडली, तर मुंबईची पाचवी पेनल्टी जाहूने घेतल्यावर नवीनने चपळाईने बचाव केला. त्यानंतर सहाव्या पेनल्टीवर गोव्याचा ईशान पंडिता, मुंबईचा अमेय रानवडे, सातव्या पेनल्टीवर गोव्याचा जोर्गे ओर्टीझ, तर मुंबईचा मुर्तडा फॉल यांनी गोल केले,. त्यामुळे 4-4 अशी बरोबरी होती. आठवी पेनल्टी गोव्याकडून आदील खानने सत्कारणी लावली, तर मुंबईच्या मंदार राव देसाई याने गोल केला होता. त्यामुळे 5-5 अशी बरोबरी होती.
सामन्याची सुरुवात चुरशीने झाली. दुसऱ्याच मिनिटाला गोव्याचा बचावपटू सेव्हियर गामा याला चकवून मुंबईचा बचावपटू अमेय रानवडे याने चेंडूवर ताबा मिळविला. अमेय आगेकूच करू लागताच मुंबईचा बचावपटू आदिल खान याने त्याला रोखले.
सहाव्या मिनिटाला मुंबईचा मध्यरक्षक ह्युगो बुमूस याने स्वतःच्या संघाच्या क्षेत्रात डावीकडून आगेकूच केली. आघाडी फळीतील अॅडम ली फाँड्रे उजवीकडून धावत असल्याचे त्याने हेरले. त्याने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर अॅडमने छातीने नियंत्रण मिळविले. तो फटका मारणार तोच आदिलने चेंडू बाहेर घालविला.
सातव्या मिनिटाला मुंबईचा मध्यरक्षक अहमद जाहु याने चेंडू गोलक्षेत्रात मारला. त्यावर बचावपटू मुर्तडा फॉल याने उडी घेत हेडिंग केले. त्यानंतर मध्यरक्षक रेनीयर फर्नांडीस याने प्रयत्न केला, पण अवघड कोनामुळे चेंडू थेट गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंग याच्या दिशेने गेला. सुरवातीला अडखळल्यानंतर धीरजने चेंडूवर ताबा मिळविला.
18व्या मिनिटाला गोव्याला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक अल्बर्टो नोग्युरा याने घेतला, मात्र त्याने मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याच्या अगदी जवळ चेंडू मारला. त्यामुळे अमरींदर सहज बचाव करू शकला. 24व्या मिनिटाला बुमूसने चेंडूवर ताबा मिळवून उजवीकडून आगेकूच केली. त्याने अमेयला पास दिला, पण ही चाल गोव्याचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग याने रोखली.
38व्या मिनिटाला मुंबईला मिळालेली फ्री किक अहमद जाहू याने घेतली. त्याने बुमूसला गोलक्षेत्राबाहेर चेंडू दिला. त्यावेळी बुमुसने प्रयत्न केला, पण चेंडू नेटवरून गेला. 43व्या मिनिटाला बुमुसने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला आणि मध्यरक्षक बिपीन सिंगला पास दिला. बिपीनने मध्यरक्षक विघ्नेश दक्षिणामुर्तीच्या दिशेने चेंडू मारला, पण या चालीचे फिनिशींग होऊ शकले नाही.
पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत मुंबईचा मध्यरक्षक रॉलीन बोर्जेस याने मध्यरक्षक जोर्गे ओर्टीझ याला पाडले. त्यावेळी या दोघांत शाब्दिक चकमक झडली, पण रेफरी एल. अजितकुमार मैतेई यांनी दोघांना शांत केले. 55व्या मिनिटाला गोव्याला थ्रो-इनची संधी मिळाली. बचावपटू इव्हान गोंझालेझ याने गामाच्या दिशेने चेंडू फेकला. गामाने चेंडूवर नियंत्रण मिळवित आगेकूच केली आणि नेटच्या दिशेने फटका मारला, पण अमरींदरने चेंडू अडविला.
62व्या मिनिटाला गोव्याच्या मध्यरक्षक रोमारीओ जेसुराज याने उजवीकडे बदली स्ट्रायकर इशान पंडिता याच्या दिशेने चेंडू मारला. इंडिताने झेपावत हेडिंग केले, पण अमरींदरने चेंडू चपळाईने अडविला. 75व्या मिनिटाला डावीकडे मुंबई सिटीला मिळालेला कॉर्नर जाहुने घेतला. त्याने मारलेला चेंडू गामाने हेडिंगद्वारे बाहेर घालविला. त्यामुळे बुमूसला संधीच मिळू शकली नाही.
अतिरीक्त वेळेतील पहिल्या सत्रात एकूण 103व्या मिनिटाला गोव्याला उजवीकडे मिळालेली फ्री किक मध्यरक्षक एदू बेदियाने घेतली. त्याने नेटच्या दिशेने मारलेला चेंडू अमरींदरने बाहेर घालविला. अतिरीक्त वेळेतील दुसऱ्या सत्रात एकूण 109व्या मिनिटाला मुंबई सिटीला मिळालेली फ्री किक जाहूने घेतली. त्याने मारलेला चेंडू थोपविण्यासाठी गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंग पुढे सरसावला. त्यावेळी त्याची आणि गोंझालेझची धडक झाली.
113व्या मिनिटाला मुंबईचा मध्यरक्षक हर्नान सँटाना याने चेंडू हेडिंगवर मागे घालवला, पण पुरेशी ताकद न लावल्यामुळे पंडिताला संधी मिळाली. पंडिताने वेगाने धावत चेंडूवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच अमरींदरने दक्षतेने पुढे सरसावत चेंडू बाहेर घालविला.
115व्या मिनिटाला गोंझालेझने उजवीकडून आगेकूच केली. त्याने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण मुंबई सिटीचा बचावपटू मुर्तडा फॉल याने चेंडू हेडिंगद्वारे रोखला.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१: कट्टर प्रतिस्पर्धी गोवा-मुंबई सिटी आज आमने-सामने
आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानला गारद करीत मुंबई सिटीच अव्वल
आयएसएल २०२०-२१: हैदराबादविरुद्ध गोलशून्य बरोबरीसह गोवा बाद फेरीत दाखल