गुवाहाटी, २४ नोव्हेंबर : हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीची पराभवाची मालिका सलग सातव्या सामन्यात कायम राहिली. हिरो आयएसएल इतिहासात सलग सात सामने गमावणारा नॉर्थ ईस्ट युनायटेड हा पहिला संघ ठरला. मुंबई सिटी एफसीने शुक्रवारी गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि ३-१ अशा विजयासह तालिकेत अव्वल स्थान पटकावले. मुंबई सिटी एफसीकडून अहमद जाहू (१० मि. – पेनल्टी), बिपिन सिंग (२८ मि.) आणि परेरा डियाझ (४६ मि. ) यांनी गोल केले, तर नॉर्थ ईस्ट युनायटेडसाठी पार्थिब गोगोईने (१७ मि.) एकमेव गोल केला.
हिरो आयएसएलमध्ये उभय संघांमध्ये आजच्या लढतीपूर्वी १६ सामने झाले आणि मुंबईने त्यापैकी ७ मध्ये बाजी मारली आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेडनेही ५ विजय मिळवले असून चार सामने अनिर्णित राहिले आहेत. मुंबई सिटीविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीलाच निर्णय नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या विरोधात आलेला पाहायला मिळाला. रोछार्झेलाने १८ यार्ड बॉक्सबाहेर ग्रेग स्टीवर्टवर फाऊल केला, परंतु रेफरीने तरीही पेनल्टी दिली. या निर्णयाविरोधात नॉर्थ ईस्ट युनायटेडचे खेळाडू नाखूश दिसले. १०व्या मिनिटाला अहमद जाहूने पेनल्टीवर गोल करून मुंबई सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण, यजमानांनी त्याला प्रत्युत्तर दिले आणि १७व्या मिनिटाला रोमेस फिलिपोटीक्सच्या पासवर पार्थिब गोगोईने बरोबरीचा गोल केला. पुढच्याच मिनिटाला मुंबईने जवळपास परत आघाडी मिळवली होती, परंतु यावेळी नॉर्थ ईस्टचा बचाव चांगला राहिला.
मुंबईकडून सातत्याने आक्रमण झालेले दिसला आणि २६व्या मिनिटाला बिपिन सिंगच्या क्रॉसवर वन ऑन वन स्थिती निर्माण झाली होती आणि त्यात गोलरक्षक मिर्शाद मिचूने अप्रतिम बचाव केला. नॉर्थ ईस्टचे खेळाडू पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेले खरे, परंतु मुंबईचा बचाव त्यांना मागे जाण्यास भाग पाडत होता. त्याचवेळी मुंबईच्या ग्रेग स्टीवर्टने संधी साधली. स्टीवर्टने उजव्या बाजूने दिलेल्या क्रॉसवर बिपिन सिंगने हेडरद्वारे गोल केला आणि मुंबई सिटी पुन्हा २-१ अशी आघाडीवर आली. ३६व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टच्या गोलरक्षकाने मुंबईकडून काही सेकंदात झालेले जबरदस्त प्रयत्न अयशस्वी ठरवले. मिर्शाद ज्या पद्धतीने सर्वस्व पणाला लावून खेळताना दिसत होता, तसा हारभार नॉर्थ ईस्टचे खेळाडू लावताना दिसले नाहीत. मध्यंतरानंतर त्यांच्या खेळात चाहत्यांना सुधारणा अपेक्षित होती.
नॉर्थ ईस्टसाठी दुसरा हाफ भयानक स्वप्न घेऊन आले. ४६व्या मिनिटाला बिपिन सिंगने मारलेला चेंडू मिर्शादने रोखला, परंतु तो समोरच उभ्या असलेल्या परेरा डियाझकडे गेला अन् मुंबईच्या खेळाडूने संधी साधून आघाडी ३-१ अशी भक्कम केली. ५०व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टने गोल करण्याची संधी निर्माण केली, परंतु पार्थिब ऑफ साईड होता. मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व सामन्यावर जाणवत होते, तरीही यजमानांकडून रटाळ खेळ सुरू होता. ६०व्या मिनिटानंतर नॉर्थ ईस्टने अचानक खेळाची गती वाढवली अन् गोल करण्याची संधी निर्माण केली. पण, मुंबईचा बचाव तितकाच सक्षम होता. मुंबईनेही जबरदस्त आक्रमण करताना आघाडी आणखी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. नॉर्थ ईस्टला आणखी एक पराभव पत्करावा लागला. मुंबईने ३-१ असा विजय मिळवून १८ गुणांसह तालिकेत अव्वल स्थान पटकावले.
निकाल : मुंबई सिटी एफसी ३ ( अहमद जाहू १० मि. ( पेनल्टी), बिपिन सिंग २८ मि., परेरा डियाझ ४६ मि. ) विजयी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी १ ( पार्थिब गोगोई १७ मि.)
(Mumbai City FC is table toppers with resounding win; North East United’s seventh defeat in a row.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील
जणू लाईफ लाईन परतली… ! स्टेडियमवर पुन्हा परतल्याने एफसी गोवा संघाचे फॅन्स आनंदी