मुंबई। शिवशक्ती (अ) महिला संघाने मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत “कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे” जेतेपद पटकाविले. श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आणि अशोक मंडळ यांनी कुमार गटाची अंतिम फेरी गाठली. ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे झालेल्या कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती(अ)ने शिवशक्ती(ब) महिला संघाचे आव्हान ३७-२५ असे परतवून लावत स्व.सौ. द्रौपदी मारुती जाधव स्मृती चषक पटकाविला.
शिवशक्ती(अ) संघाने आक्रमक सुरुवात करीत झटपट गुण घेण्याचा सपाटा लावला आणि पहिल्या डावात २६-१२ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत असलेली आघाडी टिकविण्यावर भर देत आपला विजय निश्चित केला. एकत्र सराव करीत असल्यामुळे शिवशक्ती(ब) संघाला ही आघाडी कमी करणे जड गेले. त्यामुळे त्यांना पराभवाचा झटका बसला. रिया मडकईकर, क्रीप निकम यांच्या झंजावाती चढाया, तर प्राची भादवणकर हिच्या आक्रमक पकडी या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. रिद्धी हडकर, सिद्धी सरवदे, नेहा गुप्ता यांचा खेळ शिवशक्ती(ब) संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला.
कुमार गटाच्या उपांत्य सामन्यात श्री गणेश स्पोर्ट्सने श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाचा विरोध ३९-२५ असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली. पूर्वार्धात जोरदार खेळ करीत १८-०९ अशी मजबूत आघाडी घेणाऱ्या श्री गणेशने उत्तरार्धात देखील आपल्या खेळातील जोश कायम राखत विजयाला गवसणी घातली. तेजस शिंदेच्या धारदार चढाया त्याला विनेश गायकरची मिळलेली पकडीची साथ त्यामुळे हा विजय शक्य झाला. पराभूत श्रीरामच्या भावेश महाजन, अंकुश पाल यांना आज सूर सापडला नाही.
अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अशोक मंडळाने जय भारत मंडळाचा कडवा प्रतिकार ३५-२८ असा मोडून काढत अंतिम फेरी गाठली. पहिल्या डावात ११-१७ अशा ६गुणांनी पिछाडीवर पडलेल्या अशोक मंडळाने दुसऱ्या डावात टॉप गिअर टाकत आपला खेळ उंचावला. त्यांच्या सूरज सुतार, संतोष ठाकूर, शशांक मोकल, विघ्नेश पाटील, ओम डफळे यांनी चढाई-पकडीचा चौफेर खेळ करीत अशोक मंडळाला विजय मिळवून दिला. आतिष आव्हाड, निखिल पाटील, यश सायगवकर यांनी पहिल्या डावात जय भारताला आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या डावात त्यांना ती राखता आली नाही. त्यामुळे जय भारतला पराभवाचा सामना करावा लागला.
कुमारी गटाचे बक्षीस वितरण माजी महापौर सौ.किशोरी पेडणेकर, निरंजन नलावडे, गोपाळ खाडे व जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
महत्त्वाच्या बातम्या –
भयानक.! भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या