मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित पुरुष, महिला, कुमार (मुले-मुली), किशोर (मुले-मुली), पुरुष ब, क, विशेष व्यावसायिक, व्यावसायिक अ आणि महिला व्यावसायिक अशा सर्व गटाच्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दिनांक १२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान होणार असून काल १२ ऑक्टोबर रोजी पुरुष स्थानिक क श्रेणी गटापासून यास्पर्धेची सुरुवात झाली.
काल उद्घाटन प्रसंगी मुंबई शहर कबड्डी असो. चे प्रमुख कार्यवाहक व भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे पंच समन्वयक श्री विश्वास मोरे, मुंबई शहर कबड्डी असो कार्याध्यक्ष मनोहर इंदुलकर, खजिनदार सौ शुभांगी पाटील, तसेस कार्यकारणी मंडळ सदस्य, पंच मंडळाचे अध्यक्ष महेंद्र हळदणकर, पंच मंडळाचे सचिव सूर्यकांत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
नवबालक क्रीडा मंडळ विरुद्ध ज्ञानेश्वर क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात ज्ञानेश्वर क्रीडा मंडळाने ४५-१९ एकतर्फी विजय मिळवला. दिलीप जुईकर आणि संतोष वासले यांनी चांगला खेळ केला. श्री हनुमान सेवा मंडळ विरुद्ध शिवशंकर क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या लढतीत शिवशंकर क्रीडा मंडळाने ४९-३३ असा विजय मिळवत पुढीलफेरीत प्रवेश केला.
माऊली स्पोर्ट्स मंडळ विरुद्ध जय स्वदेश यांच्यात एकतर्फी लढत झाली. माऊली मंडळाने ५३-०९ असा धुव्वा उडवला. बालविकास मित्र मंडळाने ५२-१७ असा आर्य सेवा मंडळावर विजय मिळवला. यजमान मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ संघाने श्री जाकादेवी क्रीडा मंडळावर ४२-२६ असा विजय मिळवला. रामेश्वर शिंदे, दर्शन खरात यांनी चांगला खेळ केला.
श्री साई क्लब, प्रगती क्रीडा मंडळ, अभिनव नगर चाळ कमिटी यांच्या विरुद्ध संघ अनुपस्थित राहिल्यामुळे या संघाना पुढे चाल देण्यात आली. दादोजी कोडंदेव क्लबने ५५-२१ असा युवा मैत्री क्लब वर विजय मिळवला.