मुंबई| मुंबई इंडियन्स आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी गाजवला. आज झालेल्या बऱ्याच सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांना शतकी वेसही ओलांडता आली नाही. पण गोलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या दिवसात श्रेयस हिर्लेकरच्या शतकी खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.
श्रेयसच्या शतकाच्या जोरावर कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संघाने मोठा विजय मिळवला. त्यांनी विरारच्या एनजी वर्तक हायस्कूल संघावर १८३ धावांनी विजय मिळवला. श्रेयसच्या १२८ धावांच्या खेळीला प्रणव सावंतच्या ६७ धावांची साथ मिळाल्याने स्वामी विवेकानंद संघाने ३३ षटकांत ३ बाद २९१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात वर्तक हायस्कूल संघाला ८ बाद १०८ धावा करता आल्या.
आजच्या दुसऱ्या हायस्कोरींग सामन्यात बोरिवलीच्या व्ही के कृष्णा मेनन अकादमी संघाने एसएम शेट्टी हायस्कूलवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तेजस यादव (७८) आणि प्रेम सिंग (६७*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मेनन अकादमीने ५ बाद २७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात एसएम शेट्टी हायस्कूलचा संपूर्ण संघ ३१.२ षटकांत ७५ धावांत माघारी परतला. मेनन अकादमीच्या शिवम वर्माने ३ विकेट्स घेतल्या. त्याने फलंदाजीतही नाबाद २९ धावांचे योगदान दिले आणि त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
अन्य सामन्यात कार्डिनल ग्रेसीआसच्या हेरंब कानुकाळेने (४ विकेट्स), सेंट मेरी हायस्कूलच्या चार्ल्स मेनेझेस (३ विकेट्स), सरदार वल्लभभाई पटेल संघाच्या वरुण गोहिल (४ विकेट्स), विब्ग्योअर हायस्कूलच्या चिराग वकील (४ विकेट्स) आणि मॉडर्न इंग्लिशस्कूलच्या वेदांत मयेकर (५ विकेट्स आणि नाबाद ११ धावा) यांनी गोलंदाजीत प्रभुत्व दाखवले.
संक्षिप्त धावफलक
१४ वर्षांखालील मुले
कार्डिनल ग्रेसीआस हायस्कूल ३०.१ षटकांत ८ बाद ७५ (हेरंब कानुकाळे १२, युवराज गुप्ता १०) वि. वि. गोकुळधाम हायस्कूल (गोरेगाव) २३.४ षटकांत सर्वबाद ७४; सामनावीर – हेरंब कानुकाळे (४ विकेट्स )
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली) ३३ षटकांत ३ बाद २९१ (श्रेयस हिर्लेकर १२८, प्रणव सावंत ६७) वि. वि. एनजी वर्तक हायस्कूल (विरार ) ३३ षटकांत ८ बाद १०८; सामनावीर- श्रेयस हिर्लेकर (१२८ धावा)
सेंट मेरी हायस्कूल (माझगांव) ६.२ षटकांत बिनबाद ३३ (प्रथमेश आसावळे २०*, ओमार ॲश्टन १२*) वि. वि. बी ए के स्वाध्याय भवन (माटुंगा) सर्वबाद ३०; सामनावीर – चार्ल्स मेनेझेस (३ विकेट्स)
व्ही के कृष्णा मेनन अकादमी (बोरिवली) ४० षटकांत ५ बाद २७८ (तेजस यादव ७८, प्रेम सिंग ६७*) वि. वि. एस एम शेट्टी हायस्कूल ३१.२ षटकांत सर्वबाद ७५ ; सामनावीर – शिवम वर्मा (३ विकेट्स आणि नाबाद २९ धावा)
सरदार वल्लभभाई पटेल (कांदिवली) ४.१ षटकांत १ बाद ३८ (हर्षित यादव १६*, विनीत जैन ८*) वि. वि. सेंट फ्रांसिस हायस्कूल (कांजुरमार्ग) १५.३ षटकांत सर्वबाद ३५; सामनावीर – वरुण गोहिल (४ विकेट्स)
विब्ग्योर हायस्कूल आयसीएसई (गोरेगाव) ३.१ षटकांत बिनबाद ३६ (तनिष शेट्टी २१*, संश्रय सराफ ९*) वि. वि. सीपी गोएंका इंटरनॅशनल स्कूल १५.१ षटकांत सर्वबाद ३३ ; सामनावीर – चिराग वकील (४ विकेट्स)
मॉडर्न इंग्लिश हायस्कूल (चेंबूर ) ४ षटकांत १ बाद २५ (वेदांत मयेकर ११*, आदित सुर्वे २) वि. वि. सेंट पॉल हायस्कूल १०.१ षटकांत सर्वबाद २४; वेदांत मयेकर (५ विकेट्स आणि नाबाद ११ धावा )
लक्षधाम हायस्कूल (गोरेगाव) २९ षटकांत २ बाद १३० (उत्सव दलिया २४, सौरिश देशपांडे २०) वि. वि. रायन इंटरनॅशनल स्कूल (खारघर) ३१.४ षटकांत सर्वबाद १०७; सामनावीर – श्रावण म्हात्रे (४४ धावा आणि २ विकेट्स; रायन इंटरनॅशनल स्कूल)
१६ वर्षांखालील मुली
अंजुमन ए इस्लाम मुस्तफा फैख हायस्कूल (तुर्भे) १७ षटकांत ५ बाद २४१ (सैमा खान १८*, सफल शेख १२) वि. वि. शेठ विरचंद देवजी स्कूल (घाटकोपर) १८ षटकांत ७ बाद २११; सर्वोत्तम खेळाडू – सफल शेख (३ विकेट्स आणि १२ धावा).