आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. खेळाडूंना कायम राखण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लिलावाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे हा लिलाव पार पडेल. सोबतच आयपीएल संघांनी देशांतर्गत क्रिकेटमधील नवनवीन चेहऱ्यांना पारखण्यास देखील सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने नागालँडचा युवा फिरकीपटू ख्रिवित्सो केन्से याला चाचणीसाठी निमंत्रित केले आहे.
मुंबई इंडियन्सने दिले केन्सेला निमंत्रण
पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आगामी हंगामासाठी आपल्या संघात नवीन खेळाडूंना सामील करून घेण्यासाठी शोधाशोध सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या काही खेळाडूंना त्यांनी मुंबई येथे चाचणीसाठी बोलावून घेतल्याचे समजत आहे. या खेळाडूंमध्ये नागालँडचा १६ वर्षीय लेगस्पिनर ख्रिवित्सो केन्से याचा देखील समावेश आहे. मुंबईचे युवा खेळाडू शोधणारे प्रशिक्षक केन्सेचा खेळ पाहून प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आयपीएल खेळणारा नागालँडचा पहिला क्रिकेटपटू बनवू शकतो केन्से
एका आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ दरम्यान मुंबईच्या प्रशिक्षक गटाचे काही लोक केन्सेचा खेळ पाहून प्रभावित झाले. नागालँडमधील एका अत्यंत छोट्या खेड्यातून येणार्या केन्सेला मुंबई इंडियन्ससारख्या संघाकडून चाचणीसाठी बोलावणी येणे खूप मोठी गोष्ट आहे. केन्से आयपीएल लिलावात सहभागी झाला आणि त्याच्यावर बोली लागली; तर नागालँड क्रिकेटसाठी ही अभिमानाची गोष्ट असेल. तसेच आयपीएल खेळणारा तो उत्तर पूर्वीय विभागातील पहिला क्रिकेटपटू बनेल.
टी२० स्पर्धेत केन्सेने केली दमदार कामगिरी
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ या स्पर्धेत केन्सेने दमदार कामगिरी केलेली दिसून येते. केन्सेने स्पर्धेत चार सामने खेळताना ७ बळी मिळवले होते. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ५.७० इतका प्रभावी राहिलेला. केन्से प्रतिनिधित्व करत असलेल्या नागालँड संघानेही स्पर्धेत चार सामने खेळताना चारही सामन्यात विजय मिळवला होता. तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र
टीम इंडियाच्या कामगिरीवर इंग्लंडचे माजी कोच फिदा, म्हणाले “भारताला मायदेशात हरवणे कठीण”
स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान