इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२२मधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी (२७ मार्च) पार पडला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा दारूण पराभव केला. आयपीएलच्या या पहिल्याच सामन्यात झालेल्या पराभवानंतर मुंबईच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झालीये.
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबईने (Mumbai Indians) प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १७७ धावा केल्या होत्या. यासोबतच दिल्लीला १७८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान फक्त १८.२ षटकात ४ विकेट्स राखत पूर्ण केले. यामुळे मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यासह मुंबई इंडियन्स संघाची आयपीएलच्या मागील १० हंगामात खेळलेल्या पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची १०वी वेळ होती.
मुंबईला २०१३ ते २०२२ यादरम्यानच्या १० हंगामात खेळलेल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. अशा नकोशा विक्रमात मुंबई संघ अव्वल क्रमांकावर आहे. मुंबईव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स संघ आहे. दिल्ली संघ २०१३ ते २०१८ यादरम्यानच्या ६ हंगामात सलामीच्या सामन्यात पराभूत झाला आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून यष्टीरक्षक इशान किशनने नाबाद सर्वाधिक ८१ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ११ चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्माने ४१ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी अनुक्रमे २२ आणि १२ धावा केल्या. इतर फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटके गोलंदाजी करताना त्याने १८ धावा दिल्या. त्याच्याव्यतिरिक्त खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्सने जिंकले आयपीएलचे ५ किताब
मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या ५ हंगामात आयपीएलचा किताब जिंकला आहे. विशेष म्हणजे, मुंबईला हे पाचही किताब रोहित शर्माच्या नेतृत्वात मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण
नाद नाद नादच! आता रोहित अन् धोनीसह ‘या’ यादीत विराटचेही घेतले जाणार नाव; पाहा काय केलाय कारनामा