पुणे: मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या पुणे टप्प्याला बुधवारपासून सुरुवात झाली. नागपूर टप्प्याप्रमाणे पुण्यातही प्रथमच मुंबई इंडियन्स ज्युनियर स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवसाचा उत्सवमूर्ती होण्याचा मान क्रिश शहापूरकरने मिळवला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर १६ वर्षांखालील मुले गटात सेठ दग्दुरम कटारिया स्कूल संघाने विजयी सलामी दिली.
१६ वर्षांखालील मुले गटात सेठ दग्दुरम कटारिया स्कूल संघाने ३३ षटकांत ८ बाद ३३९ धावांचा डोंगर उभा केला. क्रिशने १३० धावांची वादळी खेळी केली. त्याला कृष्णा देवतर्सेच्या ७२ धावांची तोलामोलाची साथ लाभली. प्रतिस्पर्धी डॉन बॉस्को स्कूल संघाला हे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ २३ षटकांत ५९ धावांत माघारी परतला. शतक झळकावणाऱ्या क्रिशने गोलंदाजीतही ३ षटकांत १ निर्धाव षटक टाकून २ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
याच गटात सिंबॉयसिस स्कूल संघाने प्रोडीगी पब्लिक स्कूल संघावर २३८ धावांनी विजय साजरा केला. अमेय दांडेकरच्या ७८ चेंडूंवरील १२५ धावांची तडाखेबाज खेळी आणि सुश्रुत सावंतच्या नाबाद ४४ धावांच्या जोरावर सिंबॉयसिस संघाने ३७ षटकांत ९ बाद २९० धावा केल्या. प्रत्युत्तरात प्रोडीगी पब्लिक स्कूलला १३ षटकांत ७ बाद ५२ ( सर्वबाद) धावा करता आल्या.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात निलय शिंगवीची गोलंदाजीने कमाल दाखवली. दी बिशॉप स्कूल ( कॅम्प ) संघाचा संपूर्ण संघ १७४ धावांत माघारी परतला. पण, निलयने एंजेल मिकी मिनी स्कूल संघाच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून दी बिशॉप संघाला १०९ धावांनी विजय मिळवून दिला. एंजेल मिकी मिनी स्कूल संघ ११.४ षटकांत ६५ धावांवर गडगडला. निलयने ५ षटकांत १३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्याने २ निर्धाव षटके टाकली.
डीईएस सेकंडरी स्कूलच्या वेदांत जोशीची ११३ चेंडूंत १२८ धावांची खेळी आणि मुलींच्या गटात एडब्ल्यू सिंधू विद्या भवन रुचिका पुरोहित ( ३-०-३३-४) आणि प्रोडीगी पब्लिक स्कूल संघाच्या आचल अगरवाल ( नाबाद २० धावा आणि ४ विकेट्स) यांच्या कामगिरीनेही दिवस गाजवला.
संक्षिप्त धावफलक
१६ वर्षांखालील मुले
सिंबॉयसिस स्कूल ३७ षटकांत ९ बाद २९० ( अमेय दांडेकर १२५, सुश्रुत सावंत ४४*) वि. वि. प्रोडीगी पब्लिक स्कूल १३ षटकांत ७ बाद ५२ ( सर्वबाद); सामनावीर – अमेय दांडेकर ( ७८ चेंडूंत १२५ धावा)
सेठ दग्दुरम कटारिया स्कूल ३३ षटकांत ८ बाद ३३९ ( क्रिश शहापूरकर १३०, कृष्णा देवतर्से ७२) वि. वि. डॉन बॉस्को स्कूल २३ षटकांत ९ बाद ५९; सामनावीर – क्रिश शहापूरकर ( ५१ चेंडूंत १३० धावा आणि ३-१-२-३)
१४ वर्षांखालील मुले
दी बिशॉप स्कूल ( कॅम्प ) सर्वबाद १७४ ( ओमकार भागवत ३८, पृथ्वीराज टिंगरे २८) वि. वि. एंजेल मिकी मिनी स्कूल ११.४ षटकांत सर्वबाद ६५; सामनावीर – निलय शिंगवी ( ५-२-१३-५)
डीईएस सेकंडरी स्कूल ४ बाद ३३५ ( वेदांत जोशी १२८, तनिश पवार ७०) वि. वि. डॉ. जीजी शाह इंग्लिश मीडियम स्कूल २५.१ षटकांत सर्वबाद ११७; सामनावीर – वेदांत जोशी ( ११३ चेंडूंत १२८ धावा)
दी बिशॉप को.एज्युकेशन स्कूल १५.३ षटकांत २ बाद १४६ ( आर्यन जाधव ७१*, पार्थ मालापूरे ४४) वि. वि. विद्या भवन स्कूल ३५.२ षटकांत सर्वबाद १४५; सामनावीर – आर्यन जाधव ( नाबाद ७१ धावा)
दी कल्याणी स्कूल ९ बाद २०७ ( मनन थरेजा ९६*, आर्यन सिंग ३४) वि. वि. जयहिंद हायस्कूल ९ बाद २०६; सामनावीर – मनन थरेजा ( नाबाद ९६ धावा)
१६ वर्षांखालील मुली
एडब्ल्यू सिंधू विद्या भवन १८.२ षटकांत ५ बाद १०२ ( शृष्टी जाधव २४, सिद्धी काते १२) वि. वि. अहिल्यादेवी हायस्कूल १५ षटकांत सर्वबाद १०१; सर्वोत्तम खेळाडू – रुचिका पुरोहित ( ३-०-३३-४)
प्रोडीगी पब्लिक स्कूल ११.१ षटकांत १ बाद ७६ ( मनस्वी आर्या २९*, आचल अगरवाल २०*) वि. वि. डीईएस सेकंडरी स्कूल १५ षटकांत ५ बाद ७५; सर्वोत्तम खेळाडू – आचल अगरवाल ( नाबाद २० धावा आणि ४ विकेट्स)