इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५९वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने आपल्या खिशात घातला. हा मुंबईचा हंगामातील तिसरा विजय होता. या पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. (Mumbai Indians won by 5 wickets)
या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, चेन्नई सुपर किंग्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा डाव १६ षटकात ९७ धावांवरच संपुष्टात आला. हे आव्हान मुंबई संघाने १४.५ षटकात ५ विकेट्स गमावत पार केले.
Match 59. Mumbai Indians Won by 5 Wicket(s) https://t.co/c5Cs6Dq7TK #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
मुंबईकडून फलंदाजी करताना तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऋतिक शोकीन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी प्रत्येकी १८ धावांचे योगदान दिले. तसेच, टीम डेविडने नाबाद १६ धावांचे योगदान देत विजयी षटकाराने संघाला सामना जिंकून दिला. त्यापूर्वी फॉर्मशी झगडणाऱ्या ईशान किशन याने फक्त ६ धावा केल्या. डॅनियल सॅम्स आणि ट्रिस्टन स्टब्स यांना खास कामगिरी करता आली नाही. सॅम्स १, तर स्टब्स शून्य धावेवर तंबूत परतला.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मुकेश चौधरीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतरिक्त सिमरजीत सिंग आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाकडून कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३३ चेंडूंचा सामना करताना नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारांची बरसात केली. धोनीव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. मागील सामन्यात वादळी खेळी करणारा डेवॉन कॉनवे आणि मोईन अली हे फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले. याव्यतिरिक्त महीश तीक्षणाही शून्यावर बाद झाला. दुसरीकडे, ड्वेन ब्रावोने १२, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. मात्र, या खेळाडूंना आपल्या संघाला १०० धावांचा आकडा पार करून देता आला नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना डॅनियल सॅम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना फक्त १६ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रमणदीप सिंग यांनीही प्रत्येकी १ विकेट चटकावली.
या विजयानंतरही मुंबई इंडियन्स गुणतालिकेत १०व्या स्थानी, तर चेन्नई संघ ९व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, मागील १३ हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश न करण्याची ही चेन्नईची दुसरी वेळ आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक तीर, तीन निशाणे! वॉर्नरने झटक्यात विराट, डिविलियर्स अन् गेलला टाकले मागे, पाहा पठ्ठ्याचा कारनामा