संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस या महामारीच्या संकटाला सामोरे जात आहे. अशात भारत सरकारने देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरी वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ घालवत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरही त्याचा वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियाचा जास्त वापर करत आहे.
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जाफरने (Wasim Jaffer) काही दिवसांपुर्वीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. कालच (११ एप्रिल) जाफरने त्याच्या ११ जणांच्या सर्वकालीन मुंबई रणजी संघाची (Mumbai Ranji Team) निवड केली आहे. याविषयीची माहिती त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.
त्याने आपल्या संघात खूप निवडक खेळाडूंना स्थान दिले आहे. या संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची निवड करण्यात आली आहे. तर मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी (Vinod Kambli) यांचा समावेश आहे.
आपल्या संघात यष्टीरक्षक म्हणून जाफरने भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांना निवडले आहे. याव्यतिरिक्त फिरकीपटू गोलंदाजीसाठी साईराज बहुतुले आणि रमेश पवार यांना संधी दिली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून अजित आगरकर आणि अब्दुल इस्माइल यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय जाफरने संघात झहीर खान (Zaheer Khan) आणि अभय कुरुविला यांनाही स्थान दिले आहे. तर, गुलाम पारकर यांना संघातील १२वा खेळाडू म्हणून पर्यायी रुपात ठेवण्यात आले आहे.
असा आहे जाफरचा सर्वकालीन मुंबई संघ- (Jaffer’s All Time Mumbai Team)
सुनिल गावस्कर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित (यष्टीरक्षक), साईराज बहुतुले / रमेश पवार, अजित आगरकर / अब्दुल इस्माइल, झहीर खान, अभय कुरुविला, पद्माकर शिवाल्कर, गुलाम पारकर (संघातील १२ वा खेळाडू).
ट्रेंडिंग घडामोडी-
-गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर