मुंबई । खोटे कागदपत्र सादर करून बडोदा येथील अकॅडमीमध्ये एका खेळाडूने प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. या अकॅडमीमध्ये प्रवेश करून घेण्यासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याने मदत केली असल्याची माहिती समोर येत आहे. मुनाफ पटेल हा 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य आहे.
क्रिकट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, शिवम भारद्वाज नावाच्या एका युवा खेळाडूने खोटे कागदपत्र देऊन प्रवेश घेतल्याचे बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या निदर्शनास आले आहे. हा खेळाडू गुजरात राज्याबाहेरील आहे. तरीही त्याने बीसीए अकॅडमीत प्रवेश घेतला आहे. शिवम 16 वर्षांखालील बडोदा संघाकडून क्रिकेट खेळू इच्छित होता. वास्तविक पाहता, शिवमचे वय सोळा वर्षांपेक्षा जास्त आहे. तसे त्याने काही खोटी कागदपत्रे सादर केली आहेत.
शिवमने खोटी कागदपत्र सादर केलीच. शिवाय त्याचे आधार कार्ड देखील खोटे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता मुनाफ पटेलचे नाव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुनाफ पटेलने शिवम यास अॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली आहे.
बडोदा क्रिकेट असोसिएशन मुनाफ पटेल आणि शिवम भारद्वाज यांच्यावर कोणती कारवाई करणार याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. 23 जुलै रोजी बडोदा क्रिकेट असोसिएशनची बैठक होणार आहे. ज्यामध्ये या मुद्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत मुनाफ आणि शिवम भारद्वाज यांच्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे भारताचा हा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल हा चांगलाच अडचणीत सापडला आहे.
मुनाफ पटेल (Munaf Patel) ने भारताकडून 13 कसोटी सामन्यात 35 बळी घेतले आहेत. 70 वनडे सामन्यात 86 बळींची नोंद त्याच्या नावावर आहे. टी20 सामन्यात मुनाफने 4 बळी घेतले.