बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा भारत यष्टीरक्षक फलंदाजाच्या समस्येशी झगडत आहे. याचा प्रत्यय आशिया चषक आणि आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकात आला. भारताने दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांच्यावर विश्वास ठेवला होता, परंतु दोन्ही खेळाडूंनी खूपच निराश केले. अशात एक यष्टीरक्षक फलंदाज भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये या फलंदाजाने आपल्या बॅटमधून अक्षरश: आग ओकली आहे. हा खेळाडू इतर कुणी नसून तमिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशन म्हणजेच नारायण जगदीशन आहे. त्याने मागील पाच सामन्यात सलग 5 शतके झळकावली आहेत. यामध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध चोपलेल्या 277 धावांचाही समावेश आहे.
एन जगदीशनची विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी
विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेच्या या हंगामात एन जगदीशन (N Jagdeeshan) याने आंध्रप्रदेशविरुद्ध 114 धावा, छत्तीसगडविरुद्ध 107 धावा, गोवाविरुद्ध 168 धावा, हरियाणाविरुद्ध 123 धावा आणि अरुणाचल प्रदेशविरुद्ध 277 धावा चोपल्या. त्याने आपल्या या खेळीने निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तसेच, रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यासाठीही धोक्याची घंटी बनला आहे. जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी 2022मध्ये 6 डावांमध्ये 159च्या सरासरीने 799 धावा चोपल्या आहेत.
Five consecutive List-A hundreds for N Jagadeesan ????
Tamil Nadu opener became the first batter in the world to achieve the feat.#NJagadeesan #TN #VHT #Cricket pic.twitter.com/1zX7jzliJ6
— Wisden India (@WisdenIndia) November 21, 2022
पंतची निराशाजनक कामगिरी
दुसरीकडे, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो सातत्याने फ्लॉप होत आहे. पंत मागील 10 डावांमध्ये अर्धशतक ठोकू शकला नाहीये. आशिया चषक आणि टी20 विश्वचषकातही पंतची बॅट शांतच राहिली होती. टी20 विश्वचषकात त्याने शेवटच्या दोन सामने खेळले. यामधये त्याला फक्त 9 धावा करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पंतचा खराब फॉर्म सुरूच आहे आणि दुसऱ्या टी20 सामन्यात सलामीला फलंदाजीला उतरलेल्या पंतला फक्त 13 धावा करण्यात यश आले.
जगदीशनची कारकीर्द
एन जगदीशनच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने फक्त 26 प्रथम श्रेणी सामने, 42 अ दर्जाचे सामने आणि 51 टी20 सामने खेळले आहेत. 26 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 37.08च्या सरासरीने 4 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 1261 धावा चोपल्या आहेत. दुसरीकडे, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 8 शतके आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 2059 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 44.55इतकी आहे. तसेच, टी20 क्रिकेटमध्ये त्याने 32.24च्या सरासरीने 1064 धावा केल्या आहेत. टी20मध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा तब्बल 118.61 इतका आहे.
त्याच्या यष्टीरक्षणाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 61 झेल आणि 3 यष्टीचीत केले. तसेच, अ दर्जाच्या सामन्यात 24 झेल आणि 6 यष्टीचीत केले. टी20त त्याच्या नावावर 17 झेल आणि 5 यष्टीचीत आहे. दुसरीकडे, त्याने आयपीएलमध्येही 7 सामने खेळले आहेत. शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्द याच वर्षी खेळला होता. मात्र, आयपीएल 2023च्या ऑक्शनपूर्वी चेन्नई संघाने त्याला करारातून मुक्त केले आहे. (Narayan Jagadeesan became a threat to cricketer rishabh pant after five consecutive centuries in odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नव्या रंगात नव्या ढंगात होणार पुढील टी20 विश्वचषक! बदलणार सारी गणिते
विराट की बाबर, विलियम्सनच्या मते कुणाचा कव्हर ड्राईव्ह सगळ्यात भारी? घ्या जाणून