ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात नुकताच ऍशेस मालिकेतील पहिला सामना पार पडला आहे. ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर झालेला हा सामना यजमान ऑस्ट्रेलिया ९ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या या सामना विजयात, जितका वाटा कर्णधार पॅट कमिन्स आणि फलंदाज ट्रॅविस हेड यांचा राहिला, तितकाच फिरकीपटू नेथन लायन याचाही राहिला.
या ३४ वर्षीय गोलंदाजाने या सामन्यात ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. यासह त्याने ४०० कसोटी विकेट्सच्या खास विक्रमासही गवसणी घातली. मात्र हा विक्रम करण्यासाठी त्याला फार काळ प्रतिक्षा करावी लागली आहे.
गाबा कसोटीतील प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या पहिल्या डावात लायनला एकही विकेट घेता आली नव्हती. परंतु दुसऱ्या डावातील त्याच्या दुसऱ्या षटकातच त्याला मोठे यश मिळाले. कसोटी शतकाच्या दिशेने घोडदौड सुरू असलेल्या इंग्लंडच्या विस्फोटक फलंदाज डेविड मलानला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. ८२ धावांवर खेळत असलेल्या मलानला त्याने मार्नस लॅब्यूशानेच्या हातून झेलबाद केले. मलानची ही विकेट लायनसाठी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४०० वी विकेट ठरली.
४०० व्या विकेटसाठी तब्बल ३२६ दिवसांची प्रतिक्षा (Longest wait from 399th Test wicket to 400th)
मलाननंतर त्याने इंग्लंडच्या अजून ३ फलंदाजांना बाद केले आणि ४०३ विकेट्सचा आकडा गाठला. परंतु लायनला ४०० कसोटी विकेट्स घेण्याची खास कामगिरी करण्यासाठी तब्बल ३२६ दिवस वाट पाहावी लागली आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्याने कसोटी कारकिर्दीतील ३९९ विकेट घेतली होती. त्यावेळी भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा त्याचा बळी ठरला होता. यानंतर ४०० विकेट्सच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर असलेल्या लायनला पुढील विकेटसाठी जवळपास ११ महिन्यांची प्रतिक्षा करावी लागली.
इतकेच नव्हे तर, ३९० ते ४०० पर्यंतचा प्रवास करण्यासाठीही (Longest wait from 390th Test wicket to 400th)
लायनने ७०४ दिवस म्हणजे जवळपास २ वर्षे वाट बघितली आहे. जानेवारी २०२० मध्ये त्याने कसोटीतील ३९० वी विकेट घेतली होती. न्यूझीलंडचा क्रिकेटपटू बीजे वॅटलिंग त्याचा ३९० वा बळी ठरला होता.
अखेर गाबा कसोटीत ४०० विकेट्सची विक्रमी कामगिरी आपल्या नावे करत त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरात आपले नाव कोरले आहे. तो कसोटीत हा विक्रम करणारा जगातील १६ वा फलंदाज ठरला आहे. तर फिरकीपटूंमध्ये असा करणारा तो फक्त चौथाच गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी मुथैय्या मुरलीधरन (८०० विकेट्स), आर अश्विन (४२७ विकेट्स) आणि हरभजन सिंग (४१७ विकेट्स) यांनी ही अद्वितीय कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची ‘अनलकी त्रिमूर्ती’! ज्यांना मिळायला हवी होती दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी
‘मुंबईकर’ सौरभला हटवून मोनांक पटेलकडे अमेरिका वनडे संघाचे नेतृत्व