भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने पार पडले आहेत. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या काही प्रेक्षकांनी भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंवर वर्णभेदावरुन टिपणी केली होती. यावर ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू नॅथन लायनने प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू नॅथन लायन बुधवारी म्हणाला, “भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वर्णभेदावरुन टिप्पणी करणार्या लोकांचे प्रकरण पुढे आणून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. ज्यामुळे भविष्यात खेळाडूंना धीर मिळेल आणि अशा प्रकरणांत धाडस दाखवतील. लायन म्हणाला क्रिकेट सर्वांसाठी आहे. त्यामुळे वर्णभेदासारखे गैरव्यवहार करणार्या गोष्टींना कोणताही थारा नाही.”
तिसर्या कसोटीत सिडनी मैदानावर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मोहमद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णभेदावरुन टिप्पणी केली होती. ज्यानंतर सुरक्षारक्षकांनी टिप्पणी करणार्या त्या सहा प्रेक्षकांना स्टेडियममधून हाकलून लावले होते. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास केला जात आहे. भारतीय संघाने तिसर्या दिवसाच्या खेळानंतर अधिकृतपणे तक्रार केली आहे. तसेच आयसीसीने या प्रकरणाचा अहवाल क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मागवला आहे.
या प्रकरणावर बोलताना नॅथन लायन म्हणाला, “खेळामध्ये कोणत्याही प्रकारच्या वर्णभेदावरील टिप्पणीला थारा नाही. लोकांना वाटते ते मस्करी करत आहे, मात्र याच्यामुळे लोकांवर खूप परिणाम होवू शकतो. जर कधी कोणत्या खेळाडूला वाटले याबद्दल अधिकाऱ्याकडे तक्रार करावी, तर त्यांनी निश्चित करावी. त्यावेळी मैदानावर खूप सुरक्षारक्षक तैनात असतात, जे अशा प्रकारच्या टिप्पणी करणार्या लोकांना बाहेर काढतील. ” तसेच नॅथन लायन म्हणाला की, “अपेक्षा आहे की भविष्यात लोक यातून काहीतरी शिकतील आणि फक्त क्रिकेट पाहण्यासाठी येतील. ज्यामुळे खेळाडूंना कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागणार नाही.”
दरम्यान, सिडनी कसोटीबाबत बोलायचे झाल्यास दुसर्या डावात भारतीय संघाकडून रिषभ पंतने 118 चेंडूचा सामना करताना 12 चौकार आणि 3 षटकार खेचत दमदार 97 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने 205 चेंडूचा सामना करताना 12 चौकारांच्या सहाय्याने 77 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यांनंतर अश्विन आणि विहारी यांनी चिवट फलंदाजी करतांना सामना अनिर्णीत राखला. दुसर्या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याचबरोबर पॅट कमिन्स याने 1 गडी बाद केला.
महत्वाच्या बातम्या:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : आंध्र प्रदेशवर 6 विकेट्सने मात करत दिल्लीचा सलग दुसरा विजय
टीम पेनने सोडलेल्या झेलाबद्दल कामरान अकमलची प्रतिक्रिया, मला आनंद वाटतो की
ब्रिस्बेन कसोटीसाठी भारताचे फिरकी अस्त्र तयार? कुलदीप यादवने केला कसून सराव, पाहा व्हिडिओ