पुणे। महाराष्ट्र रोइंग संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४१व्या राष्ट्रीय ज्युनियर रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत यजमान महाराष्ट्र पदकापासून दूर राहणार आहे. सीएमई येथील आर्मी रोइंग नोड येथे ही स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर , सचिव संजय वळवी, उपाध्यक्ष नरेन कोठारी उपस्थित होते.
स्पर्धेत रविवारी झालेल्या उपांत्य फेरीनंतर महराष्ट्र संघ केवळ तीन शर्यतीत अंतिम फेरी गाठू शकला. मात्र, ही ब श्रेणीतील अंतिम फेरी असणार असून, यातील निर्णयाचा फायदा मानांकन निश्चितीसाठी होती.
या तिन्ही शर्यतीत महाराष्ट्र चौथ्या स्थानाने अंतिम फेरीपर्यंत पोचले. यातही कॉक्सलेस पेअर्स प्रकारात महाराष्ट्राची निलेश धोंडगे आणि अथर्व रावत ही जोडी दुर्दैवी ठरली. पदकाच्या शर्यतीत येण्याची त्यांना चांगली संधी होती. मात्र, मध्य प्रदेशाच्या जोडीबरोबर त्यांची धडक झाली आणि ते जखमी झाले. त्यांच्या मनगटाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी एका खेळाडूला वेदना होत असल्यामुळे प्रशिक्षकांनी त्यांना शर्यतीत उतरण्याची परवानगी दिली नाही. तसेच या अपघाताविषयी मुख्य रेफ्रींना सूचित करण्यात आले असून, त्यांना योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आले आहे. या गटात बॉईज स्पोर्टस सेंटर आणि मध्य प्रदेश यांच्यात सुवर्ण लढत होईल.
त्यानंतर मुलांच्याच सिंगल स्कल प्रकारात महाराष्ट्राचा ऋषिकेश शिंदे या शर्यतीत चौथ्या क्रमांकाने अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अर्थात, तो देखिल अखेरच्या दिवशी मानांकनासाठीच लढेल. त्याला तमिळनाडूचे आव्हान राहिल. या प्रकाराची सुवर्ण शर्यत बॉईज स्पोर्टस आणि हरियाणा यांच्या खेळाडूत होईल.
मुलींच्या सिंगल स्कल शर्यतीत महाराष्ट्राच्या कस्तुरी चौगुले हिने प्रयत्नांची शिकस्त केली. पण, तिला पहिल्या दोनमध्ये येता आले नाही. तीने चौथ्या क्रमांकाने उपांत्य फेरी पूर्ण केली. आता ती मानांकनासाठी उतरेल. तिच्यासमोर तमिळनाडूचेच आव्हान असेल. पदकाची शर्यत मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांच्यात होईल.
स्पर्धेत बॉईज स्पोर्टस सेंटर, मध्य प्रदेशाच्या खेळाडूंचा वरचष्मा राहिला. त्यांनी बहुतेक शर्यतींच्या अंतिम फेरीत पहिल्या दोन क्रमांकाने प्रवेश केला. मुलींमध्ये केरळ आणि पश्चिम बंगाल, हरियाणाच्या मुली सरस ठरल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
फॉर्म्यूला वनच्या इतिहासातील सर्वात रोमांचक शर्यतीवर रिऍक्ट झाले सचिन, रोहित; पाहा काय म्हणाले?