नवी दिल्ली । क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जो कोणत्याही खेळाडूचे आयुष्य बदलून टाकू शकतो. आज कोणताही युवा खेळाडू आयपीएलचा एक मोसम जरी खेळला, तरी त्याच्या आयुष्यात खूप बदल होतात. हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांंबद्दल जर बोलायचं झालं, तर त्यांना केवळ १००-२०० रुपयांसाठी सामने खेळण्यासाठी ओळखले जात होते. परंतु ते दोघेही आज करोडपती आहेत.
तरीही असे प्रत्येक क्रिकेटपटूसोबत होत नाही. काही खेळाडू असेही असतात, ज्यांच्या आयुष्यात क्रिकेट खेळूनही सुधारणा झाली नाही. इतकेच नव्हे, तर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खेळाडूंना आपले कुटुंब चालवणेही कठीण झाले आहे. अशीच कहाणी न्यूझीलंडच्या एका फलंदाजाची आहे. ज्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळली होती. परंतु आज त्याच्याकडे कायमची (पक्की) नोकरीदेखील नाही.
मॅथ्यू सिंक्लेयरची कारकीर्द
अनेक क्रिकेटप्रेमींना न्यूझीलंडचा फलंदाज मॅथ्यू सिंक्लेयरचे (Mathew Sinclair) नाव माहीत असेल. त्याने आपल्या कारकीर्दीत न्यूझीलंडकडून खेळताना ३३ कसोटी सामने, ५४ वनडे सामने आणि २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १६३५ धावा केल्या होत्या. त्यात ३ शतकांचा समावेश आहे. तसेच, वनडेत १३०४ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकांचा समावेश आहे.
सिंक्लेयरचा विक्रम
सिंक्लेयरने १९९९मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्याने आपल्या पहिल्या डावातच ४४७ चेंडूत २२ चौकारांच्या मदतीने २१४ धावांची द्विशतकी खेळी केली होती. असा कारनामा करणारा न्यूझीलंडचा तो पहिलाच खेळाडू ठरला होता. त्यानंतर त्याने अनेक मोठ्या खेळी केल्या. काही काळातच त्याने चांगले नाव कमावले होते. परंतु पुढे तो आपल्या कामगिरीत सातत्य ठेवू शकला नाही. त्यानंतर तो संघात आत- बाहेर होत राहिला.
निवृत्ती घेताच बदलले आयुष्य
जोपर्यंत सिंक्लेयर क्रिकेट खेळत होता, तोपर्यंत त्याच्याकडे पैसे होते. परंतु जुलै २०१३मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. त्यानंतर त्याने सांगितले, की त्याच्याकडे कोणतीही नोकरी राहिली नाही. आता त्याचे कुटुंब चालविण्यासाठी तो सरकारच्या बेरोजगार निधीवर अवलंबून आहे.
त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात क्रिकेट खेळले होते आणि त्याच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. त्यामुळे त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. त्याच्या घरात आर्थिक मंदी आली होती, त्यानंतर त्याचे पत्नीशी भांडणदेखील झाले होते. इतकेच नव्हे, तर सिंक्लेयरकडे नोकरी नसल्यामुळे कुटुंब चालविण्यासाठी त्याच्या पत्नीला एका कॉफी शॉपमध्ये काम करावे लागले. त्यानंतर सिंक्लेयरला मासे पकडणाऱ्या आणि शिकार करणाऱ्या एका कंपनीत लहानशी नोकरी मिळाली. परंतु तीदेखील ९ महिन्यांतच सुटली होती.
सिंक्लेयरची सध्याची परिस्थिती
सिंक्लेयरकडे आजही नोकरी नाही. तो एका रियल इस्टेट कंपनीशी जोडला आहे. जिथे त्याला कमिशनच्या आधारे रुपये मिळतात. म्हणजेच तो जेव्हा एखादे घर विकेल, तेव्हाच त्याला पैसे मिळतील.