गेल्या तीन वर्षांपासून खेळवल्या जात असलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अखेर २३ जून रोजी समाप्त झाली. १८ ते २३ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडसाठी हे विजेतेपद सोपे नव्हते. तीन वर्ष कठोर मेहनत करून आणि जगातील अव्वल संघांना पराभूत करत त्यांनी हा टप्पा गाठला. याच निमित्ताने या लेखातून आपण न्यूझीलंडचा हा प्रवास कसा होता, ते जाणून घेऊया.
१) श्रीलंका १ – न्यूझीलंड १, ऑगस्ट २०१९: न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत खेळली. ही दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. त्यामुळे या मालिकेतून न्यूझीलंडने ६० गुणांची कमाई केली.
२) ऑस्ट्रेलिया ३ – न्यूझीलंड ०, डिसेंबर-जानेवारी २०१९-२०: यानंतरची मालिका मात्र न्यूझीलंडसाठी एखाद्या दुस्वप्नासारखी ठरली. ऑस्ट्रेलियाकडून त्यांना ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत ३-० असा सपाटून मार खावा लागला. ही मालिका ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्यूशेनने धावांची बरसात केल्याने गाजली. न्यूझीलंडकडून टॉम ब्लंडेलचे प्रदर्शन हा त्यातल्या त्यात आशेचा किरण ठरला.
३) भारत ० – न्यूझीलंड २, फेब्रुवारी २०२०: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान खडतर केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी मायदेशातील भारताविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. या मालिकेत त्यांनी सफाईदार कामगिरी करत भारताला कोणतीही संधी दिली नाही. या विजयाने न्यूझीलंडचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले.
४) वेस्ट इंडिज ० – न्यूझीलंड २, डिसेंबर २०२०: कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक बदलले होते. त्यानुसार आपली पुढील मालिका न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरूद्ध मायदेशात खेळली. याही मालिकेत त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. दुबळ्या विंडीज संघाला त्यांनी २-० अशी सहज मात दिली. या वेळेपासून आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याचा निकष बदलला होता. त्यानुसार अंतिम सामन्याचे संघ गुणांवर नाही तर गुणांच्या टक्केवारीवर ठरवण्यात येणार होते. न्यूझीलंडसाठी हा नियम फायद्याचा ठरला.
५) पाकिस्तान ० – न्यूझीलंड २, डिसेंबर-जानेवारी २०२०-२१: न्यूझीलंडने आपला विजयी सिलसिला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत कायम राखला. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या मालिकेत पाकिस्तानचा संघ विशेष चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे यजमानांनी सहज विजय मिळवला.
या मालिकेअखेर न्यूझीलंडचे कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत ४२० गुण झाले होते. तर त्यांची गुणांची टक्केवारी ७० टक्क्यांवर गेली होती. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने पराभूत केल्याने न्यूझीलंडचे अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झाले.
या खडतर प्रवासानंतर अंतिम सामन्यात देखील न्यूझीलंडने इतिहास घडवला. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करत ऐतिहासिक जेतेपद पटकावले. यासह क्रिकेटच्या इतिहासात चॅम्पियन्स ट्रॉफी व्यतिरिक्त आयसीसीची पहिली मोठी स्पर्धा जिंकण्याची किमया न्यूझीलंडने केली. पहिल्यावाहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेते म्हणून त्यांचे नाव आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
चार दिवस दुखापतीसह खेळत वॅग्नरने न्यूझीलंड चाहत्यांना क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा दिवस दाखवला
WTC Final 2021: न्यूझीलंड म्हणजे कसोटी’किंग’, भारताला पराभूत करत पटकावले पहिलेवहिले विश्वविजेतेपद